कोरोना संसर्ग: शासकीय कार्यालयांमध्ये बेफिकिरी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:33 PM2020-10-28T12:33:54+5:302020-10-28T12:36:24+5:30
Khamgaon corona News कोरोनाचे संकट संपल्यासारखी परिस्थिती खामगाव शहरात पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: कोरोना संसर्गाचा धोका अजून टळला नाही, पण जणूकाही कोरोनाचे संकट संपल्यासारखी परिस्थिती खामगाव शहरात पहावयास मिळत आहे. कोरोनाबाबत काळजी घेताना यापूर्वी शासकीय कार्यालयात कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी होत होती. मात्र आता अशी तपासणी होत नसल्याचे 'लोकमत'ने २७ ऑक्टोबर रोजी केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये दिसून आले. खामगाव शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच यापूर्वी सर्वांची तपासणी केली जात होती. कार्यालयात हजर होणाऱ्यांशिवाय कामानिमित्त येणाऱ्यांचीही तपासणी होत होती. मात्र आता संपूर्ण चित्र उलटे दिसून येत आहे. खामगाव नगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर केवळ एक टेबल व रिकामी खुर्ची दिसून आली. मात्र कार्यालयात येणाऱ्यांची कोणतीच तपासणी होत नव्हती. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वांवरच बंधने घालून दिली आहेत. परंतु आता मात्र शासकीय कार्यालयातच उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात मंगळवारी 'लोकमत'ने शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला असता अनेक ठिकाणी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणतीच सुविधा नसल्याचे आढळून आले. मंगळवारी दुपारी १.३० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातही हेच चित्र दिसून आहे.