बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:47 PM2020-09-12T12:47:46+5:302020-09-12T12:47:54+5:30
‘आयसीएमआर’ने १५ सप्टेंबरपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १०४ व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एकीकडे राज्याचा कोरोना मृत्यूदर हा तीन टक्क्यांपेक्षा अधिक असला तरी बुलडाणा जिल्ह्यात कोराना मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले असून, ‘आयसीएमआर’ने १५ सप्टेंबरपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १०४ व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या तुलनेत जिल्ह्यात प्रत्यक्षात ६२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर नियंत्रित करण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे ‘आयसीएमआर’ने १५ सप्टेंबरपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ५,२२२ कोरोनाबाधीत रुग्ण राहतील, अशी शक्यता गणितीय सुत्राच्या आधारावर व्यक्त केली आहे. त्याच्याशी तुलना करता बुलडाणा जिल्ह्यात वर्तमान स्थितीत ४,५९७ कोरोनाबाधीत रुग्ण असून, अपेक्षेपेक्षा १२ टक्क्यांनी हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले असले तरी ते नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या प्रयत्नाचाच हा भाग असल्याने वर्तमान स्थितीत बुलडाणा जिल्ह्यात ४,५९७ कोरोना बाधीत असून ६२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ३० सप्टेंबर अखेर बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ही ८ हजार ८७७ पर्यंत जाण्याची शक्यता आयसीएमआरने व्यक्त केली असून याच कालावधीत जिल्ह्यात कोरोनामुळे १७८ व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परिणामी आरोग्य विभागाची जबाबदारी अधिक वाढली असून वर्तमान स्थितीत ३० सप्टेंबरची संभाव्य बाधीतांची संख्या पाहता प्रत्यक्षात ५१ टक्केच व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागासोबतच अन्य यंत्रणांचा समन्वयही महत्वपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २९ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला होता. तो बाधीत असल्याचे त्याच्या मृत्यूनंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींचा व कोरोनाच्या शक्यतेचा विचार करता फेब्रुवारी महिन्यापासूनच आरोग्य विभागाने अंतर्गत स्तरावर सर्वेक्षण केले होते. त्याचा प्रत्यक्ष कोरोनाचे संक्रमण रोखण्यासोबतच कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यास हातभार लागल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.