बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 08:11 PM2021-02-20T20:11:16+5:302021-02-20T20:11:32+5:30
Buldana Collector take corona Vaccine जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनीही १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रात जावून लस घेतली.
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून लसीकरण मोहिमेचाही वेग वाढविण्यात आला आहे. त्यातच जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनीही १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रात जावून लस घेतली. दरम्यान, यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाची लस ही सुरक्षीत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी न घाबरात लस घेण्यासाठी पुढे यावे. लसीकरणासंदर्भात मनात कुठलीही भीती बाळगू नये असे आवाहनच त्यांनी केले. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लस घेतलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याने लसीकरणासंदर्भात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कोरोना लसीचे २८ दिवसाच्या अंतराने दोन डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी कोरोना संदर्भातील प्रतिकार शक्ती निर्माण होते. त्यामुळे कोरोना लसीकरण झाल्यानंतरही कोरोना प्रतिबंधासंदर्भातील घालून दिलेले नियम व त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने केलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच गेल्या एक वर्षापासून जिल्हा प्रशासन व संपूर्ण आरोग्य यंत्रणा राबत आहे, त्यांचेही त्यांनी कौतुक केले. सोबतच अधिकारी कर्मचाऱ्यांनी निर्भय होवून लस घ्यावी, असे आवाहन २० फेब्रुवारी रोजी लस घेतल्यानंतर त्यांनी केले. कोरोना संसर्गाचे संक्रमण सध्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनेही यंत्रणांनी प्रयत्न करावे असे सांगितले.
--शहरात केली पुन्हा पाहणी--
कोरोनाची लस घेतल्यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी नंतर बुलडाणा शहरातील काही भागात फिरून जमावबंदी आदेश व नागरिक मास्क वापरत आहेत किंवा नाही, याची पाहणी केली. पालिका मुख्याधिकारी व काही कर्मचारीही त्यांच्या समवेत होते.