गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट यंदाही कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:56+5:302021-08-01T04:31:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेश उत्सवसुद्धा साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाने जारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेश उत्सवसुद्धा साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना, तसेच विसर्जनाच्या मिरवणुकांना बंदी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करता येणार नाही. सार्वजनिक मंडळाची मूर्ती ४ फूट आणि घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा अधिक उंच असू नये, असेही गृहविभागाने म्हटले आहे. कोरोनासंदर्भात प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये गणेशोत्सव काळात कोणतीही सूट दिली जाणार नाही. गेल्या वर्षीही गणपती मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा होती. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. आरती, भजन किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही व ध्वनीप्रदूषणही होणार नाही, याची काळजी मंडळांना घ्यावी लागेल. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती किंवा सार्वजनिक मंडळांनी भपकेबाज सजावटी करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमांमुळे भाविकांमध्ये नाराजी
यंदा शक्यतो संगमरवरी किंवा धातूंच्या गणेशमूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची असेल तर शक्यतो घरीच विसर्जन करावे. ते शक्य नसेल तर नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी ते करावे. असे नियम घालून देण्यात आले असून, यामुळे गणेश भक्तांत नाराजी आहे.