गणेशोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 12:32 PM2021-07-25T12:32:54+5:302021-07-25T12:33:00+5:30
Buldhana News : गणपतीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांनाही कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे मंदिरे अद्याप कुलूपबंद आहेत. उत्सवांवरही संक्रांत आली आहे. गणपतीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांनाही कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. बाप्पा यंदा तरी सुखकर्ता हो, अशी विनवणी मूर्तिकार करीत आहेत.
सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने आहेत. चार फुटांपेक्षा मोठ्या गणेशमूर्तींना परवानगी नाही. ‘एक गाव, एक गणपती’ही संकल्पना गावोगावी राबविण्याबाबत शासन आग्रही आहे. पीओपीच्या मूर्ती विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अवघ्या एक ते दीड महिन्यावर गणेशोत्सव असला तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मूर्तिकारांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत.
रंगकामाला सुरुवात झाली आहे; पण उत्साह मात्र दिसून येत नाही. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दर वाढले आहेत. लाल माती बाहेरील राज्यातून आणावी लागत आहे. तिचेही दर वाढले आहेत. परिणामी, गणेशमूर्तीच्या दरात यंदा २५ टक्के वाढ होणार असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.
मागील वर्षी तयार केलेल्या मोठ्या गणेशमूर्ती शिल्लक आहेत. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न मूर्तिकारांपुढे आहे. त्यातच दोन- तीन लाखांचे भांडवल अडकून पडले आहे.
वर्षानुवर्षे गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करीत आहे. मात्र, दोन वर्षांपासून प्रचंड आर्थिक अडचणी आहेत. यंदा गणेशमूर्तीसाठी लागणारे साहित्य महागले आहे. वाहतुकीचे दर वाढलेले आहेत. परिणामी, मूर्तीचे दर वाढवावे लागणार आहेत. कोरोनाचे नियम आणि निर्बंधांचा फटका सामान्य मूर्तिकारांना सोसणार नाही. सरकारने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.
-विनायक बावस्कर, अध्यक्ष, मूर्तिकार संघटना, बुलडाणा