कोरोना संदिग्धांचा उपचारासाठी अकोल्याकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:56 AM2020-09-25T09:56:01+5:302020-09-25T09:56:09+5:30
आॅगस्ट महिन्यात १०८ रुग्णवाहिकेद्वारे बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या संख्येवरून ही बाब स्पष्ट होत आहे.
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सव्वा सहा हजारांच्या घरात गेला असून बुलडाणा जिल्ह्यालगतच्या तीन जिल्ह्यांमध्ये संदिग्ध रुग्ण उपचारासाठी धाव घेत असल्याचे चित्र आहे. आॅगस्ट महिन्यात १०८ रुग्णवाहिकेद्वारे बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या संख्येवरून ही बाब स्पष्ट होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातंर्गत रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासोबतच अन्य जिल्ह्यातही रुग्णांना पाठविण्याचे काम रुग्णवाहिकांना करावे लागत आहे. मुळातच जिल्ह्यात तुलनेने रुग्णवाहिकांची संख्या कमी असून प्रसंगी रुग्णांना किंवा संदिग्धांना जिल्ह्यातील कोवीड सेंटरसह, डेडीकेटेड हॉस्पीटलमध्ये किंवा कावीड हेल्थ सेंटरमध्ये जागा उपलब्ध न झाल्यास लगतच्या जिल्ह्यात पाठविण्यात येत आहे.
त्यासंदर्भाने माहिती घेतली असता आॅगस्ट महिन्यात अकोला, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा जिल्हतील रुग्णवाहिका गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यात प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात ३३९ जणांना रुग्णवाहिकेद्वारे पोहोचविण्यात आले असून जालना जिल्ह्यात ३६ जणांना पोहोचविण्यात आले आहे. औरंगाबाद येथेही दोन जणांना पोहोचविण्यात आले आहे.े संदिग्ध रुग्णाला कोठे उपचार घ्यावा, याची मुभा आहे. अशा स्थितीत सोयी, सुविधा योग्य न वाटल्यास संदिग्ध रुग्ण हे थेट लगतच्या जिल्ह्यात चांगली सुविधा असलेल्या ठिकाणी जात आहे.