कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:31+5:302021-07-14T04:39:31+5:30
अनेक कुटुंबांचा अनावश्यक खर्च बंद : गरजेच्या वस्तूंचीच खरेदी बुलडाणा : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे पगार कमी झाले. ...
अनेक कुटुंबांचा अनावश्यक खर्च बंद : गरजेच्या वस्तूंचीच खरेदी
बुलडाणा : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे पगार कमी झाले. त्यामुळे प्रत्येक घरात किचनपासून कटिंगपर्यंत काॅस्टकटिंग सुरू झाले आहे. बहुतांश कुटुंबांनी अनावश्यक खर्च टाळण्यावर लक्ष केंद्रित केले असून गरजेच्या असलेल्या वस्तूच खरेदी करण्यात येत आहे.
दीड वर्षापासून कोरोनामुळे भयाण आणि तणावपूर्ण वातावरणातही अनेकांनी काही गोष्टी नव्या शिकल्या, तर काहींनी त्याच गोष्टी नव्याने शिकल्या. आपल्याला काही नव्या सवयी जडल्या, तर काही सवयी लावून घ्याव्या लागल्या. कोरोनाने सकारात्मक आणि नकारात्मक अंगाने आपल्या सर्वांच्याच आयुष्यात प्रचंड बदल घडवले. याचा नागरिकांवर आर्थिक व सामाजिकदृष्ट्या परिणाम झाला. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या वेतनात कपात झाली. त्यामुळे बहुतांश कुटुंबांनी अनावश्यक खर्च बंद केला आहे.
टेरेस गार्डनमुळे भाजीपाल्याचा खर्च वाचला!
लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या भीतीने भाजीपालाही विकत घेतला नाही. त्यामुळे घरीच कुड्यांमध्ये काही भाजीपाल्याची रोपे लावली. त्यामुळे महिन्याकाठी भाजीपाल्यावर होणारा काही खर्च वाचल्याचे एका कुटुंबाने सांगितले.
हॉटेलिंग थांबल्याने दीड हजार वाचले!
कोरोनाआधी प्रत्येक वाढदिवसाला सर्व कुटुंब हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते; परंतु लॉकडाऊन काळात बहुतांश पदार्थ घरीच बनविणे शिकले. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवायला जात नसल्याने प्रत्येक वाढदिवसाला दीड हजार रुपये वाचल्याचे एका कुटुंबाने सांगितले.
केक व दाढी घरीच; पाचशे बचत!
लाॅकडाऊनमध्ये बाहेर सर्वच बंद होते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसाला केक मिळत नव्हता. तसेच दाढी करायची असल्यास तेही शक्य नव्हते. या दोन्ही गोष्टी घरीच करणे शिकलो. त्यामुळे महिन्याला पाचशे रुपये बचत होत असल्याचे एका कुटुंबाने सांगितले.
कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग
कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्याने अनेक कुटुंब हॉटेलमध्ये जेवण टाळत आहे. हॉटेलमधील पदार्थ घरीच केल्या जातात.
या स्थितीत विजेच्या वस्तूचा वापर कमी केल्या जात आहे. लग्नसमारंभ बंद असल्याने नवीन कपडेही घेणे टाळत आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी घरीच कटिंग, दाढी करणे शिकले, तसेच केक बनविण्याचे प्रशिक्षणही घेतले. त्यामुळे हे सर्व घरीच होते.