बुलडाणा जिल्ह्यात ५१२९ शिक्षकांची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:19 PM2021-01-20T12:19:20+5:302021-01-20T12:19:35+5:30
Corona Test of Teacher जिल्ह्यातील ५ हजार १२९ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून सर्व नियोजन सुरू झाले आहे; परंतु कोरोना अद्यापही कायम असल्याने मुलांना शाळेत पाठविण्याची भीती पालकांमध्ये आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील ५ हजार १२९ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडून निर्णय देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. दरम्यान, दिवाळीनंतर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यातही मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांचा आढावा घेऊन तयारी सुरू केली आहे.
शाळांच्या स्वच्छतेविषयी मार्गदर्शक सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, स्वच्छतागृहाची साफसफाई, पिण्याचे पाणी, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, आदी विषयांबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
शाळा सुरू होणार असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. शिक्षकांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
-सचिन जगताप, प्रभारी शिक्षणाधिकारी, बुलडाणा