जमिनीवर बसून करावी लागली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:31+5:302021-05-25T04:38:31+5:30
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भोसा येथे कोरोना रॅपिड तपासणी शिबिर २१ मे रोजी घेण्यात आले. यावेळी १९७ जणांची तपासणी ...
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भोसा येथे कोरोना रॅपिड तपासणी शिबिर २१ मे रोजी घेण्यात आले. यावेळी १९७ जणांची तपासणी केली असता १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर दुसऱ्या दिवशी आरटीपीसीआर टेस्ट ६२ जणांची करण्यात आली असून, अहवाल येणे बाकी आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दररोज भोसा येथे कोरोना तपासणी शिबिर घेण्यात येत असून २१ मे रोजी भोसा ग्रामपंचायतचे सरपंच व सचिवच हजर नसल्याने व ग्रामपंचायत बंद असल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क करूनसुद्धा सरपंच व सचिव यांचे सहकार्य न मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आरोग्य सेवक किशोर धोटे, तलाठी म्हस्के, शिक्षक देशमुख, अंगणवाडी मदतनीस मुके यांना चक्क जमिनीवर बसूनच ग्रामस्थांची कोरोना टेस्ट करावी लागली. भोसा गावचे ग्रामसेवक नेहमीच भोसा या गावात हजर राहत नाही. त्यामुळे भोसा या ग्रामपंचायतच्या चाब्या त्यांच्याकडे राहत असल्याने आरोग्य विभागाला टेबल, खुर्च्या उपलब्ध होऊ शकल्या नाही. या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी आशिष पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नेहमीसारखी सारवासारव करीत ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे. भोसा ग्रामपंचायतने यापूर्वी कोविड लसीकरण शिबिर घेतले असते, तर भोसा गावात कोरोना रुग्णांची होणारी वाढ थांबविता आली असती. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतच्या पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रश्नही चांगलाच गाजला होता. परंतु त्या प्रकरणाचीही चौकशीही अद्याप गुलदस्त्यातच आहे.
लहान मुलांसाठी लसीकरण शिबिर
आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेविका लता कडू यांनी दरमहा होणाऱ्या लहान मुलांचे लसीकरण शिबिर भोसा येथे घेऊन १५ मुलांना डोस दिले. या वेळी अंगणवाडी सेविका शारदा डाखोरे, मदतनीस सुनीता भोेंडणे, आशा सेविका जाधव यांची उपस्थिती होती.