कोरोना चाचणी अहवाल आठवडाभर ‘वेटिंगवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:35 AM2021-04-15T11:35:42+5:302021-04-15T11:35:48+5:30
Khamgaon News : परिणामी रुग्णांवर उपचार तरी कोणते करावे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यासह जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रचंड उद्रेक होत असताना तपासणीचे अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याने रुग्ण सैरभैर झाले आहेत. परिणामी रुग्णांवर उपचार तरी कोणते करावे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे उपस्थित झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी आरोग्य यंत्रणा पार कोलमडून गेली आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने रुग्णांचे अहवाल एक ते दोन दिवसांत प्राप्त व्हायचे. संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्याच्यावर तातडीने कोरोनाचे औषधोपचार सुरू केले जायचे. मात्र गेल्या काही दिवसांत वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे.
शासकीय आरोग्य यंत्रणेने पाठविलेल्या रुग्णांच्या स्वॅबचे अहवालदेखील चार ते पाच दिवस मिळत नाहीत. त्यामुळे संबंधित रुग्ण एकतर गृहविलगीकरणात राहतो किंवा इतरत्र फिरत असतो. यातून संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
खामगाव शहरातील काही खासगी लॅबकडूनही संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. त्यानंतर ते नागपूर, अकोला, बुलडाणा, अमरावतीला पाठविले जातात. मात्र त्याचा अहवाल येण्यासाठी आठवडाभराचा विलंब होत आहे.
यासंदर्भात अकोला, नागपूर येथील चाचणी केंद्राशी संपर्क साधून विचारणा केली असता, अकोला, नागपूर शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तपासणी केंद्रांवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे बाहेरून येणारे स्वॅब स्वीकारणे सध्या बंदच केले असल्याचे या तपासणी केंद्रचालकाने सांगितले. त्यामुळे संशयीत सैरभैर झाले आहेत.
अहवालाची प्रतीक्षा कायम
संबंधित संशयित रुग्णांचे नातेवाईक दररोज तपासणी अहवाल आला काय, याची चाचपणी करीत आहेत. मात्र अहवालच मिळत नसल्याचे काही रुग्णांच्या नातलगांनी सांगितले. एकीकडे चाचणीच्या अहवालाला विलंब होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा साठादेखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने येत्या काही दिवसांत मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.