इंग्लंडमधून आलेल्या सात जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 01:25 PM2020-12-26T13:25:29+5:302020-12-26T13:25:44+5:30
Corona test of seven return from England बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या सात जणांचे ट्रेसिंग जिल्हा प्रशासनाने केले
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर तेथून बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या सात जणांचे ट्रेसिंग जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यातील एकाचे स्वॅब नमुने हे २५ डिसेंबर रोजी रात्री बुलडाणा येथे तपासणीसाठी आणण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार दिवसांपूर्वी आनुषंगिक विषयान्वये अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यासंदर्भाने २५ डिसेंबर रोजी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनास २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लंडमधून जिल्ह्यात दाखल झालेल्या अशा नागरिकांचे ट्रेसिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने लगोलग पावले उचलली आहेत. या नागरिकांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याही चाचण्या करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. सोबतच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याचीही या कामाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सात प्रवासी
जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमधून आलेल्या सात जणांची नावे २४ डिसेंबर रोजी झालेल्या व्हीसीमध्येच जिल्हा प्रशासनास पुरविण्यात आली होती. त्या अनुषंगाने शेगाव येथील एक, खामगाव येथील दोन, मलकापूर येथील तीन आणि सिंदखेडराजा तालुक्यातील एकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये शेगाव, खामगाव आणि मलकापूर येथील सहा जणांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील एकाच्या चाचणीचा अहवाल २६ डिसेंबरला मिळेल.