बियाणे उगवण क्षमतेच्या चाचणीऐवजी कोरोना चाचणीची वेळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:56+5:302021-05-16T04:33:56+5:30
बुलडाणा : खरीप हंगाम अवघ्या २२ दिवसांवर आलेला आहे. मात्र खरिपाच्या नियोजनाला कोरोनाची बाधा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
बुलडाणा : खरीप हंगाम अवघ्या २२ दिवसांवर आलेला आहे. मात्र खरिपाच्या नियोजनाला कोरोनाची बाधा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या बियाणे उगवण क्षमतेची चाचणी करण्याचे दिवस आहेत; मात्र गावात संसर्ग वाढत असल्याने शेतकऱ्यांना कोरोना चाचणीसाठी धावपळ करावी लागत आहे.
सध्या खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली आहे. शेतातील पूर्वमशागतीच्या कामाचे दिवस असताना गावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या कोरोनाची ही लाट शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही अधिक वाढलेली आहे. गावागावांत कोरोना रुग्ण सापडत असल्याने शेतकऱ्यांनाही धास्ती भरली आहे. गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडताच शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून कोरोना चाचणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत पळावे लागत आहे. खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाकडून बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात येते. शेतकरी घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरत असतील, तर बियाणे उगवणक्षमता चाचणी अत्यंत प्रभावी व अखर्चिक साधन आहे. जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणारे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांच्या चांगल्या वाढीकरिता बीजप्रक्रियाही महत्त्वाची आहे. या दृष्टीने खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त घरगुती बियाणे उगवणक्षमता चाचणी व बीजप्रक्रिया करणे आवश्यक असताना कोरोनामुळे ही कामे विस्कळीत झाली आहेत. प्रत्येक गावात आता कोरोनाचा रुग्ण सापडत असल्याने शेतकऱ्यांची कोरोना तपासणीसाठी धांदल उडत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील नियोजनही कोलमडले आहे.
बीजप्रक्रिया जनजागृतीला खो
शेतकऱ्यांना दरवर्षी दुबार पेरणीसारख्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे. परिणामी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्यासाठी कृषी विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कृषी विभागाकडूनही राबविण्यात येणाऱ्या बीजप्रक्रियेच्या जनजागृतीला खो बसला आहे.
कोरोनाच्या भीतीने शेतात कामेही राहिली...
कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यात पेरणीचे दिवस जवळ येत आहेत. शेतातील कामे करावीत, की कोरोना टेस्टसाठी पळावे.
- सागर जाधव, शेतकरी.
शेतातील कामे सोडून लस घेण्यासाठी वारंवार केंद्रावर जावे लागते; परंतु लस मिळत नाही. पेरणी जवळ येत आहे; परंतु कोरोनामुळे शेतातील कामातही मन लागत नाही.
- विलास खरात, शेतकरी.
पश्चिम विदर्भातील पेरणीचे हेक्टरी क्षेत्र
बुलडाणा ७३४१७७
अकोला ४८३२९२
वाशिम ४०६२४५
अमरावती ६९९२९९
यवतमाळ ९१६०८१