शाळेत उपस्थितीसाठी शिक्षकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:56 AM2020-11-18T11:56:50+5:302020-11-18T11:57:00+5:30
Corona test of teachers शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल शाळा व्यवस्थापनाला द्यावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल शाळा व्यवस्थापनाला द्यावा लागणार आहे. शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
शाळांमध्ये ९ ते १२ पर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. विद्याथ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील. शाळेतील परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा व इतर कार्यक्रम घेण्यावर बंदी आहे. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत मास्क घालून येणे बंधनकारक आहे. शाळा तीन तास भरविण्यात येईल. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी आदि सुविधा शाळेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे लागणार आहेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता, पर्यवेक्षण गट स्थापन केले जाणार आहेत. वर्गखोली तसेच शिक्षक स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकाच्या संमतीवरच अवलंबून आहे. शाळांनी इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिकण्यावर भर द्यावा, असेही पत्रकात नमूद आहे.