बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात १ लाख ८० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 11:22 AM2021-03-07T11:22:27+5:302021-03-07T11:22:59+5:30
CoronaVirus Test वर्षभराचा विचार करता तब्बल १४ टक्के चाचण्या या एकट्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या एक वर्षात जिल्ह्यातील सात टक्के नागरिकांच्या अर्थात १ लाख ८० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात प्रामुख्याने हा वेग वाढला असून वर्षभराचा विचार करता तब्बल १४ टक्के चाचण्या या एकट्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ८५ हजार असून, त्यापैकी कोरोना संदिग्ध वाटणाऱ्या १ लाख ८० हजार नागरिकांच्या या चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये ६९ टक्के चाचण्या या आरटी-पीसीआरच्या असून रॅपिड टेस्टचे प्रमाण २७.६१ टक्के आहे. ट्रुनॅटच्या अवघ्या ४.८८ टक्के चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी २०,९२५ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी १८ हजार ९७ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयामध्ये २,६३० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
आतापर्यंत १९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ०.९४ टक्के आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा कमी आहे. यापूर्वी तो साधारणत: १.२० ते १.३० टक्क्यांच्या आसपास राहत होता. मात्र अलीकडील काळात तो कमी झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवर
जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्क्यांच्या आसपास होते. ते आता तब्बल १० टक्क्यांनी घसरले असून, सध्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा ११.६१ टक्के आहे.