कोरोनाच्या चाचण्या वाढणार; बुलडाणा जिल्ह्याला दोन हजार रॅपीड टेस्ट किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:53 AM2020-07-06T10:53:22+5:302020-07-06T10:53:58+5:30
बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार रॅपीड टेस्ट किट मिळाल्या असून कोरोना संसर्गाच्या चाचण्या त्यामुळे वाढण्यास मदत होणार आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील तब्बल एक लाख ३१ हजार १९ नागरिक हे अद्यापही प्रतिबंधीत क्षेत्रात राहत असून कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार रॅपीड टेस्ट किट मिळाल्या असून कोरोना संसर्गाच्या चाचण्या त्यामुळे वाढण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे जागतिक संसर्ग रोग निवारण दिनीच या रॅपीड टेस्ट किटद्वारे तपासणी कशी करावी याचे प्रशिक्षणही आरोग्य यंत्रणेला दिल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
परिणामी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या तपासणीस आता वेग येणार असून जिल्ह्यातील आणखी जवळपास साडेचार टक्के नागरिकांचे आरोग्य विषयक स्क्रीनींग होण्यास मदत होईल. त्यामुळे २९ लाख लोकसंख्येपैकी जवळपास तीन लाख लोकसंख्येमधील संदिग्धांची तपासणी करून त्यांच्यावर वेळेच उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे कोरोनाचा जिल्ह्यात वाढता संसर्ग रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने सध्या डोके वर काढले असून कोरोनाचे त्रिशतक झाले आहे. प्रामुख्याने मलकापूर, खामगाव, शेगाव, सिंदखेड राजा, जळगाव जामोद, लोणार, देऊळगाव राजा, मोताळा या तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती असून त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर बैठकांचे सत्र सध्या सुरू करण्यात आले असून तालुकानिहाय माहिती संकलीत करून आगामी काळात जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
दोन दिवसापूर्वी विभागीय आयुक्तांनी बुलडाण्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी गंभीरतेने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. प्रतिबंधीत क्षेत्रात दररोज करण्यात येणारा आरोग्यविषयक सर्व्हे अधिक गांभिर्याने करण्यात यावा, अशा सुचना दिल्या होत्या.त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यास दोन हजार रॅपीट टेस्ट किट (अॅन्टीगेन किट) उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या १०५ वर पोहोचली असून त्यापैकी २० प्रतिबंधीत क्षेत्र शिथील करण्यात आले आहेत. सध्या ८५ प्रतिबंधीत क्षेत्रात नियमित स्वरुपात सर्व्हेक्षण करण्यात येत असून एक लाख ३१ हजार १९ नागरिकांचे नियमीत सर्व्हेक्षण करण्यात येत असून त्यासाठी ५५२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील १६७ भाग कोरोना रुग्ण सापडल्यामुळे प्रभावीत असून यात काही गावे व शहरी भागातील काही प्रभागांचा समावेश आहे.
शहरातून जाणाऱ्या हायवेवरही देखरेख?
सध्या आंतरजिल्हास्तरावर प्रवासासाठी रोखटोक नसल्यामुळे महामार्गावरून प्रवासादरम्यानही कोरोना संसर्गाचे संक्रमण होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर जड वाहतूक तथा महामार्गावरील वाहने शहरातून न जावू देता त्यांना बायपासचा वापर करण्यास बाध्य करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर विचार विनिमय सुरू आहे. प्रामुख्याने बुलडाणा, नांदुरा, सिंदखेड राजा, मोताळा सारख्या ठिकाणी वाहने ही शहरातूनच जातात. त्यामुळे त्यातून कोण आले, कोण उतरले याबाबत फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे खबरदारी घेवून प्रसंगी अनावधाने संक्रमीत व्यक्तीकडून संसर्ग होण्याची भीती असते. अशा पार्श्वभूमीवर याबाबतही काही उपाययोजना करता येतील का? हा मुद्दाही प्रशासकीय पातळीवर विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे.