Corona Vaccination : बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ६१ ज्येष्ठांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:46 AM2021-03-02T11:46:23+5:302021-03-02T11:46:31+5:30
Corona Vaccination : बुलडाणा जिल्ह्यात १३ शासकीय केंद्रांवर (रुग्णालयात) ६१ जणांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सॉप्टवेअरमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आला. मात्र, त्याउपरही जिल्ह्यातील १३ शासकीय केंद्रांवर (रुग्णालयात) ६१ जणांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली. कोरोना लसीकरणसाठी आवश्यक असलेल्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे १ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीमध्ये व्यत्यय आला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात २ मार्चपासून खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजार असणाऱ्यांचे लसीकरणार प्रारंभ होईल. दरम्यान, कोविन ॲप व आरोग्य सेतू ॲपवर १ मार्च रोजी सायंकाळपासून ज्येष्ठांची लसीकरणासाठीची नोंदणी सुरू झाली आहे.
१ मार्चपासून जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार होती. पहिल्या दिवशी आलेल्या तांत्रिक समस्या व जनसामान्यांमध्ये लसीकरणासंदर्भात असलेल्या संभ्रमामुळे लसीकरण मोहिमेस फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील १५ खासगी रुग्णालयांपैकी चार रुग्णालयांत २ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटांतील दुर्धर आजार असणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्या नुषंगाने या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, १ मार्च रोजी सायंकाळी या चारही रुग्णालयांना कोरोना व्हॅक्सिन देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे दिवसभर तांत्रिक अडचणीमुळे ज्येष्ठ नागरिक तथा दुर्धर आजार असणाऱ्यांची नोंदणी ॲपवर होऊ शकली नाही. केंद्र सरकारकडून दिवसभर या ॲपमधील त्रृट्या दूर करण्यात येऊन सायंकाळ दरम्यान, प्रत्यक्षात ज्येष्ठांची नोंदणी सुरू झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात ६० वर्षांवरील नागरिक व ४५ ते ५९ वयोगटांतील दुर्धर आजार असणाऱ्यांच्या लसीकरण मोहिमेसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेस प्रभारी अपर जिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण कांबळे, पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉ.विवेक साबळे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के नागरिक हे वृद्ध असून, अशा ५ लाख ३७ हजार नागरिकांचे तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी दिली. सोबतच लसीकरण मोहिमेदरम्यान लसींचा कोणी काळाबाजार केला, तर संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण कांबळे यांनी जिल्ह्यात २ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम सुरळीत सुरू होईल. बुलडाणा जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व सहा ग्रामीण रुग्णालय स्तरावर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. यासोबतच पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत १५ रुग्णालयांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बुलडाणा येथील अमृत हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, कोलते हॉस्पिटल मलकापूर आणि कोठारी हॉस्पिटल, चिखली येथे रुग्णालयामध्ये कोरोना प्रतिबंधासाठीचे लसीकरण करण्यात येणार आहे. २५० रुपयांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध असणार असून, यापैकी १५० रुपये हे केंद्र सरकारच्या खात्यात तर १०० रुपये हे संबंधित रुग्णालयाला सेवाशुल्क मिळतील, असे डॉ.कांबळे म्हणाले.
एका केंद्रावर किमान १०० जणांना लस
एका लसीकरण केंद्रावर एका दिवशी किमान १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठीची नोंदणी ही कोविन ॲप किंवा आरोग्य सेतू ॲपवरून करता येईल, तसेच वैयक्तिक स्तरावर प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण कांबळे म्हणाले.
सायंकाळी मिळाले व्हॅक्सिन
खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रशिक्षण १ मार्च रोजी पूर्ण झाले असून, सायंकाळी या रुग्णालयांना कोरोना लसीचे डोस देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.