कोरोना लस संपली, लाभार्थी लसीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:28+5:302021-04-11T04:34:28+5:30
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम सुरू होता. प्रथम ६० वर्षांवरील आणि दुर्धर आजारग्रस्तांना प्रथम प्राधान्य ...
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम सुरू होता. प्रथम ६० वर्षांवरील आणि दुर्धर आजारग्रस्तांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला मनातील भीती कायम राहिल्याने, अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागले. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने, घराघरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपणालाही कोरोना होऊ शकतो, या धास्तीने ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली आहे. त्यातही शेंदुर्जन, वर्दडी, जांभोरा या उपकेंद्रातही लस उपलब्ध करून देण्यात आली. अवघ्या काही दिवसांतच लस संपली. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी लस उपलब्ध नसल्याने, काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तहसीलदार सुनील सावंत यांनी २०० लस सिंदखेडराजा येथून प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा येथे पोहोचविल्या होत्या. त्यातील काही शेंदुर्जन उपकेंद्रात पाठविण्यात आल्या. १० एप्रिल रोजी केवळ १२ वाजेपर्यंत लसीकरण चालले. त्यानंतर, लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाचा डोस थांबला. पुढील लसीकरण केव्हा सुरू होईल, यात संभ्रम असून, कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आजपर्यंत १६ टक्के लसीकरण झाले आहे. केंद्राकडून १५ एप्रिलपूर्वी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लस उपलब्ध होताच, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा लसीकरण सुरू होईल.
डॉ.महेंद्र साळवे,
तालुका वैद्यकीय अधिकारी, सिंदखेडराजा