कोरोना योध्यांचे बुलडाण्यात जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:39 PM2020-05-03T17:39:58+5:302020-05-03T17:40:09+5:30
कोरोना विरोधातील लढाई निश्चितच आपण जिंकू असा विश्वास सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
बुलडाणा: वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या व कोवीड-१९ रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांचेही बुलडाणेकर तितक्याच जल्लोषात निवासस्थानी परतल्यानंतर स्वागत करत आहेत. सोबतच कोरोना विरोधातील लढाई निश्चितच आपण जिंकू असा विश्वास सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २४ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडले असून कोवीड रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर यापैकी १९ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या बुलडाणा जिल्ह्यात अवघे चार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण राहले असून यापैकीही दोघांची येत्या दोन दिवसात सुटी होण्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचीही हळुहळु ग्रीन झोनकडे एकप्रकारे वाटचाल सुरू झाली आहे.
दुसरीकडे रोटेशन पद्धतीने आरोग्य विभागातील ५० परिचारिका, डॉक्टर हे कोवीड रुग्णालयामध्ये आपली सेवा देत आहे. त्यांचा निर्धारित कालावधी संपल्यानंतर जवळपास १४ दिवस ते क्वारंटीन राहत असून घरी पोहोचल्यानंतर त्यांचे परिसरातील नागरिकांकडून जंगी स्वागत केले जात आहे. बुलडाण्यातील परिचारिका चित्रा जोशी यांचेही शहरातील विष्णुवाडी भागातील नागरिकांनी त्यांचा निर्धारित १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करून त्यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली.
लढण्याचे मिळते बळ!
अशा स्वागतामुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना विषाणूशी असलेल्या लढ्यात जिंकण्याचे बळ मिळते, अशी भावनाच चित्रा जोशी यांच्या देहबोलीतून यावेळी जाणवत होती. नागरिकांच्या अशा समर्थनामुळे कोरोना युद्ध जिंकण्याचे एक स्पीरीट वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिकांना मिळत आहे आणि त्याचाच प्रत्यय सध्या बुलडाण्यात येत आहे.