CoronaVirus : १२ विदेशी नागरिकांची प्रकृती ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:17 PM2020-03-18T18:17:20+5:302020-03-18T18:17:27+5:30
या १२ ही जणांना क्वारंटीन आणि आयसोलेशन कक्षातून १८ मार्च रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
बुलडाणा: एका धार्मिक कार्यक्रमासाठी इंडोनेशिया आणि मलेशियातून जिल्ह्यात आलेल्या ‘त्या’ १२ जणांची प्रकृती ठणठणीत असून या १२ ही जणांना क्वारंटीन आणि आयसोलेशन कक्षातून १८ मार्च रोजी सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात पाच मार्च पासून आजपर्यंत ३० जण दाखल झाले असून त्यापैकी एकही कोरोना पॉझीटीव्ह नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्यापही एका रुग्णाचा तपासणी नमुना येणे बाकी आहे.
शेगाव आणि खामगाव येथील धार्मिक कार्यक्रमासाठी मलेशिया आणि इंडोनेशियातून १२ नागरिक जिल्ह् यात दाखल झाले होते. त्यापैकी तिघांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील इंदिरा गांधी गर्व्हमेंट वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल १६ मार्च रोजी निगेटीव्ह आले होते. त्यानंतरही या नागरिकांना मॉनिटरिंग खाली ठेवण्यात आले होते. दरम्यान, मॉनिटरिंगमध्येही त्यांना कुठलीच समस्या न जानवल्यामुळे १८ मार्च रोजी त्यांना क्वारंटीन कक्ष आणि आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात परदेशातून मूळ जिल्हा निवासी असलेले ३० जण परत आले आहे. त्यांचीही तपासणी करण्यात येऊन त्यांना होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १९ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे तर एका व्यक्तीचा मधुमहे व ह्रदयरोगामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अद्याप एकही व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण सहा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेले आहे तर एकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
तीन देशांचा नोटीफाईड देशांच्या यादीत समावेश
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जगातील सात देश नोटीफाईड असून खबरदारीचा उपाय म्हणून या देशांच्या यादीत महाराष्ट्राने अमेरिका, सौदी अरेबिया आणि युएई या देशांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात सौदी अरेबियातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे.