CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील १,६३४ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 01:09 PM2020-08-23T13:09:14+5:302020-08-23T13:09:25+5:30
आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता अडीच हजारावर पोहचली आहे. त्यामध्ये बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनामूक्त झालेल्या एकाही रुग्णाला पुन्हा कोरोनाची बाधा झाली नाही. कोरोना विषाणूच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार होतात, त्यामुळे बरे झालेल्यांना पुन्हा संक्रमण होण्याची भीती तशी फार कमी आहे.
जिल्ह्यात गत महिन्याभरपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ हजार ५५७ वर पोहचली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्यावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही हजारोंच्या घरात पोहचले आहे. काही ठिकाणी करोनावर मात केल्यानंतरही अनेकांना बाधा होत असल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनातून बरा झाल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह आला नाही. कोरोनामूक्त झालेल्या अशा रुग्णांपासून संसर्ग फैलावण्याचा धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर १० दिवसासाठी त्या रुग्णाला कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने त्याला खाणे पिणे, व उपचार केले जातात. १० दिवसानंतर कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्ण कोरोनामूक्त झाले आहेत. त्यांना वैद्यकीय प्रोटोकालप्रमाणे सुटी देण्यात आली. बरे झालेले रुग्ण घरी गेल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह आले नसल्याने रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे. या व्यक्तींच्या शरीरात प्रतिरक्षक द्रव्य (अँटीबॉडीज) तयार होताता, त्यामुळे या बरे झालेल्यांना पुन्हा संक्रमणाचा धोका कमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
कोरोनामूक्त झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह येण्याचा प्रकार जिल्ह्यात आतापर्यंत कुठेच दिसून आला नाही. उपचारानंतर रुग्ण कोरोनाविरुद्ध लढण्यास सक्षम होतात. दहा दिवसांच्या उपचारामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष दिल्या जाते.
-प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.