CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ७२ हजार नागरिक परतले; चिंतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:46 AM2020-05-16T10:46:45+5:302020-05-16T10:47:21+5:30
परतणाऱ्या या नागरिकांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्यासोबतच जिल्ह्यात संक्रमणाचा धोका गडद होत असून चिंतेतही भर पडतेय.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : परदेशासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात तब्बल ७२ हजार ३९६ नागरिक गेल्या काही दिवसात दाखल झाले असून १४७ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे आढळून आली आहे. सातत्याने स्वगृही परतणाऱ्या या नागरिकांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्यासोबतच जिल्ह्यात संक्रमणाचा धोका गडद होत असून चिंतेतही भर पडतेय.
नागरिकांचे हे स्वगृही सुरू झालेले स्थलांतर पाहता ग्रीन झोनकडे वाटचाल करणाºया बुलडाणा जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. नरवेल आणि मलकापूर पांग्रा येथील दोन्ही प्रकरणे त्याचे जिवंत उदाहरण आहेत.
दुसरीकडे शासकीय स्तरावर अधिकृत आकडेवारी ही ७२ हजार ३९६ च्या आसपास असली तरी अनधिकृतरित्या अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल होत असून जवळपास दीड लाखांच्या घरात हा आकडा जाऊ शकतो, असे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढत असल्याची भावना निर्माण होत आहे. आज घडीला जवळपास ८०० च्या आसपास प्रत्यक्षात कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून ७५० च्या आसपास प्रत्यक्षात स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत.
जिल्ह्यात दाखल झालेल्या ७२ हजार ३९६ नागरिकांपैकी ७२ हजार १५५ नागरिकांच्या हातावर क्वारंटीनचे शिक्के मारण्यात आले असून त्यांना होम क्वारंटीन राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. २२९ नागरिकांची मात्र तपासणी होऊ शकली नाही. विशेष म्हणे शेगाव तालुक्यातील या नागरिकांची तपासणी राहलेली आहे. जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींमध्ये दाखल होणाºया नागरिकांची ही संख्या असून शहरी भागातील संख्या ही वेगळी आहे. गेल्या दहा दिवसातच जवळपास २२ हजार व्यक्ती स्वगृही परतल्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात ३९ हजार नागरिक स्वगृही परतले होते. त्यामुळे आता आणखी काही नागरिक हे जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.