CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचे प्रमाण २.४१ टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:19 PM2021-01-04T12:19:08+5:302021-01-04T12:19:16+5:30
CoronaVirus in Buldhana वर्तमान स्थितीत २.४१ टक्के रुग्णच सक्रिय असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून वर्तमान स्थितीत २.४१ टक्के रुग्णच सक्रिय असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अशी स्थिती असतानाही आरोग्य विभागाने आरटीपीसीआर टेस्टलाच प्राधान्य दिले असून, जिल्ह्यातील एक लाख सात हजार ९४० संदिग्ध रुग्णांपैकी ६८ टक्के संदिग्धांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत.
बुलाडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट अद्यापही ११.७४ टक्के आहे. जो की दहा टक्क्यांच्या आत प्रशासनास आणावयाचा आहे. एकंदरीत सक्रिय रुग्णांचे घटते प्रमाण पाहता येत्या कालावधीत हा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली येण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. नाही म्हणायला दैनंदिन करण्यात येणाऱ्या चाचण्यांची तुलना करता हा पॉझिटिव्हीटी रेट ९.५३ टक्क्यांवर आणण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्याच्या २६ लाख लोकसंख्येपैकी आतापर्यंत १ लाख सात हजार ९४० संदिग्धांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून, एकूण लोकसंख्येच्या ४.१५ टक्के नागरिकांच्या आतार्पंत चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १५२ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्युदर हा १.१९ टक्क्यांवर गेल्या दोन महिन्यापासून स्थिरावला आहे. हे कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे शक्य होत आहे. यासोबतच जागृती झाल्याचाही परिणामही यास कारणीभूत आहे.
२७ टक्के संदिग्धांच्या रॅपिड टेस्ट
जिल्ह्यातील ४.१५ टक्के नागरिकांच्या गेल्या नऊ महिन्यांत कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी २७ टक्के चाचण्या या रॅपिड टेस्टद्वारे करण्यात आल्या, तर आरटीपीसीआर चाचण्या ६८ टक्के संदिग्धांच्या करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटद्वारे अवघ्या पाच टक्के संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्राधान्याने आरटीपीसीआर चाचण्या व रॅपिड टेस्टला प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.