CoronaVirus : राज्यापेक्षा बुलडाणा जिल्ह्याचा मृत्यूदर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:49 PM2020-10-31T12:49:54+5:302020-10-31T12:50:03+5:30
Buldhana CoronaVirus News बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत निम्मे आहे.
बुलडाणा : आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच संदिग्ध तथा बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करण्यास प्राधान्य दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत निम्मे आहे.
सध्या हा दर १.३३ टक्के असून, गेल्या दहा दिवसांपासून तो १.३० ते १३३ च्या दरम्यान स्थिरावलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पश्चिम वऱ्हाडातील कोरोनाचा पहिला रुग्ण व पहिला बळी हा बुलडाणा शहरात गेला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणा प्रारंभापासूनच संसर्ग रोखण्यासाठी सक्रिय झाली होती. तसेच आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य दिले गेले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात काेराेनाचे रुग्ण दुप्पट हाेण्याचा वेग ५४ दिवसांवर हाेता. ताे आता ६६ दिवसांवर गेला आहे. तर पाॅझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे जिल्ह्यातील प्रमाण २४ टक्के हाेते ते आता ११ टक्केवर आले आहे. जिल्ह्यासाठी हे सुखद चित्र आहे.
कारण काय?
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, संदिग्ध रुग्ण शोधण्यास प्राधान्य देऊन वेळेत उपचार करण्यासाठी प्रयत्न केल्याने बाधितांच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. ऑक्टाेबर महिन्यात जिल्ह्यात १९ हजार चाचण्या झाल्या.