CoronaVirus in Buldhana : आणखी ११ पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २७१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:18 AM2020-07-04T11:18:14+5:302020-07-04T11:18:26+5:30
खामगाव येथील सतीफैल भागातील ८८ वर्षीय व्यक्तीचा दोन जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शुक्रवारी जिल्ह्यात पुन्हा ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा २७१ वर पोहोचला आहे. दरम्यान, खामगाव येथील सतीफैल भागातील ८८ वर्षीय व्यक्तीचा दोन जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १३ झाली आहे.
अकोला प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालापैकी ८६ अहवाल तीन जुलै रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ७५ अहवाल निगेटीव्ह असून ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नांदुरा येथील तीन, शेगाव तालुक्यातील आळसणा येथीलही तीन तर खामगावातील सतीफैलमधील येथील ८८ वर्षीय वृद्ध, फाटकपुरा येथील तीन जण आणि जळगाव जामोदमधील राणी पार्क भागातील २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दुसरीकडे आठ रुग्णांनी कोरोनावर तीन जुलै रोजी मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापूर तालुक्यातील चार, धामणगाव बढे येथील चार जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत तपासणी केलेल्यांपैकी दोन हजार ८६७ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सोबतच १६२ जण आतापर्यंत बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.
अद्याप अकोला प्रयोग शाळेत ३१८ जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या २७१ झाली आहे. पैकी १६२ व्यक्ती कोरोना मुक्त झालेल्या असून सध्या ९६ रुग्णांवर बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.
कोरोना रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राच्या संख्येतही वाढ होत असून ५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या सध्या प्रतिबंधीत क्षेत्रात आहे.