Coronavirus in Buldhana : शेगाव, खामगावातील ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:24 PM2020-04-10T22:24:17+5:302020-04-10T22:28:29+5:30
बुलडाणा जिल्ह्यास दिलासा देणारी बातमी आहे.
बुलडाणा: खामगाव आणि शेगाव येथील संदिग्ध म्हणून क्वारंटीन करण्यात आलेल्या ११ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे दुसºया चाचणीतही निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास सात दिवसानंतर या ११ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी नऊ एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल दहा एप्रिल रोजी मिळाले.
यापूर्वी दोन एप्रिल दरम्यान, शेगाव आणि खामगावातील या ११ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळीही ते निगेटीव्ह आले होते. आरोग्य विभागाच्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचनांनुसार या संदिग्ध रुग्णांचे हे स्वॅब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दुसºया चाचणीतही ते निगेटीव्ह आल्याने बुडाणा जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून सातत्याने बुलडाण्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत होता. तो १७ वर सध्या स्थिरावला आहे. अशा गंभीर परिस्थितीत तब्बल ११ जणांच्या स्वॅबच्या दुसºया चाचण्या सात दिवसानंतरही निगेटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे जिल्हावासियांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. हायरिस्क, लो रिस्कमधील रुग्णांचे अशा पद्धतीने ठरावीक कालावधीनंतर स्वॅब नमुने योग्य उपचाराच्या दृष्टीने तपासण्यात येत असतात. प्रसंगी २४ तासानंतरही दुसºयांदाही संदीग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी केल्या जाऊ शकते.
बाधीत रुग्णांची प्रकृतीही स्थिर
जिल्ह्यात आतापर्यंत पॉझीटीव्ह आढळून आलेल्या १७ रुग्णांचीही प्रकृती स्थिर व चांगली आहे. त्यामुळे कोणी घाबरून जावू नये. सोशल डिस्टंस ठेवून व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत आपण कोरोनास निश्चीत हरवू, असा विश्वास पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यातील आढावा बैठकीत व्यक्त केला आहे.