CoronaVirus in Buldhana : डॉक्टरांसाठी १,६०० पीपीई किट उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:38 AM2020-04-10T11:38:32+5:302020-04-10T11:38:54+5:30
उच्च दर्जाचे ३५०० मास्कही उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या रुपाने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना विभागीय आयुक्त पिषुय सिंह यांनी नऊ एप्रिल रोजी बुलडाण्यात दिल्या. आढावा बैठकीदरम्यान जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसाठी १६०० पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टीव इक्युवमेंट) उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी त्यांना देण्यात आली.
दरम्यान, उच्च दर्जाचे ३५०० मास्कही उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यावेळी आयुक्तांनी कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय ते आरोग्य उपकेंद्र येथे कोणत्याही प्रकारचा ताप असलेले रुग्ण आले तर त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक औषधी, मास्क, उपकरणे व साहित्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात यावी. खासगी दवाखान्यांच्या ओपीडी सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी. आणीबाणीच्या परिस्थितीत औषधांचा साठा खाजगी मेडीकलमध्येही औषधी उपलब्ध करावी, असे ते म्हणाले. चढ्या दराने अन्न व धान्याची तथा तत्सम वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. कृषि निविष्ठांची वाहतूक सुरळीत ठेवावी.
स्वस्त धान्य दुकानांमधून नियमित अन्नधान्य वाटप तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना ५ किलो मोफत तांदूळ देण्याची कायर्वाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी जिल्हा सामान्य रुग्णालय तथा स्त्री रुग्णालयाची पाहणी करून एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनास मार्गदर्शक सुचना केल्या.