CoronaVirus in Buldhana : महिनाभरात २,३४५ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:32 PM2020-09-07T12:32:55+5:302020-09-07T12:33:06+5:30
जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून एक महिन्यात २,३४५ रुग्णांची भर त्यात पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून एक महिन्यात २,३४५ रुग्णांची भर त्यात पडली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल ६१ टक्के रुग्ण हे गेल्या ३३ दिवसात निघाले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २८ मार्च रोजी पहिल्या कोरोनाबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोना बाधीतांची संख्या ५०० च्या टप्प्यात येण्यास तब्बल १०६ दिवस लागले होते. १४ जुलै रोजी जिल्हयातील बाधीतांची संख्या ५०० झाले होती. त्यानंतर मात्र कोरानाचे संक्रमण जिल्ह्यात झपाट्याने वाढले. प्रारंभी १०६ दिवसात ५०० रुग्ण असा असणारा आलेख हा जुलै-आॅगस्टमध्ये ११ दिवसावर, त्यानंतर सात दिवसांवर आणि आॅगस्टच्या अखेरीस अवघ्या तीन दिवसात ५०० रुग्ण असा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची व्याप्ती झपाट्याने वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे अनलॉक चारमध्ये लॉकडाऊन काळातील अनेक बंधने शिथील झाल्यामुळे नागरिकही बिनधास्त झाले असले तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. बाजारपेठा, दुकाने उघडावीच लागणार आहेत. लॉकडाऊनलाही काही मर्यादा होत्या. मात्र या कालावधीत प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या कोरोना पासून बचावाचे तंत्र हे सामाजिकस्तरावर एक प्रकारे अवगत झाले असले तरी वाढता बिनधास्तपणा कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.
त्यामुळे शारीरिक अंतर, मास्क वापरणे या सारख्या बाबींकडे नागरिक दुर्लक्ष करती आहेत. त्यातून हे संक्रमण अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. जेथे जिल्ह्यातील १६७ गावात आधी झालेल्या कोरोनाच्या संक्रमणाची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. ग्रामीण भागातही हा विळखा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण स्थिर
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास स्थिर असल्याचे निदर्शनास येत आहे. सरासरी ६९ ते ७२ टक्केच्या दरम्यान हे प्रमाण सद्या कमी जास्त होत असल्याचे आकडेवारी सांगते.
संक्रमणाचा वेग वाढला
जेथे एक हजार रुग्ण होण्यास जिल्ह्यात ११७ दिवस लागले होते तेथे अनुक्रमे १७ आणि १८ दिवसात प्रत्येकी हजार रुग्ण वाढले तर वर्तमान स्थितीत सहा दिवसात कोरोना बाधीतांची संख्या ८४५ झाली आहे. यावरून कोरोना संक्रमणाचा वेग जिल्ह्यात सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.