CoronaVirus in Buldhana : ३३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल आले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:12 AM2020-06-01T11:12:44+5:302020-06-01T11:13:13+5:30
३३ संदिग्ध रुग्णाचे अहवाल हे निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ३३ संदिग्ध रुग्णाचे अहवाल हे निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ दिवसापासून सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी हा दिलासा मिळाला.
नाही म्हणायला शनिवारी रात्री मलकापूरमधील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मलकापूरमध्ये पुन्हा खळबळ उडाली होती. सध्या जिल्ह्याच्या दृष्टीने जळका भडंग नंतर मलकापूर कोरोना संसर्गाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरलेला आहे.
दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील चाचणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक हजार २१६ व्यक्तींचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ५९ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. पैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून ३३ जणांची कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र दहा मे नंतर बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या आयसोलेशन कक्षामध्ये २३ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
जिल्ह्यात एक लाखा पेक्षा अधिक नागरिक हे पुणे, मुंबई व अन्य शहरी भागातून आल्याने त्यांच्यामध्ये असलेल्या काही संक्रमीत व्यक्तींमुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढलेला असला तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व्हीलन्स टिम, महसूलचे पथक, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे जिल्ह्यात वाढू पाहणारे हे संक्रमणही मर्यादीत स्वरुपात ठेवण्यात यंत्रणेला तुर्तास तरी यश आल्याचे चित्र आहे.
गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत सव्वा लाखापेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य विभागाच्या पथकांनी सर्व्हेक्षणादरम्यान प्रतिबंधीत क्षेत्रात तपासणी केली आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण चार टक्के आहे.
दरम्यान, अद्यापही ४८ स्वॉब नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. प्रामुख्याने यामध्ये मलकापूर शहरातील व्यक्तींचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)