CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी ३,६१० बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:08 AM2020-04-22T11:08:42+5:302020-04-22T11:10:33+5:30
संभाव्य आपत्कालीन स्थिती पाहता तीन हजार ६१० बेडची व्यवस्था जिल्ह्यात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून आधी पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी ८ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या सात दिवसापासून जिल्ह्यात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. दुसरीकडे आगामी काळातील संभाव्य आपत्कालीन स्थिती पाहता तीन हजार ६१० बेडची व्यवस्था जिल्ह्यात करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गास जिल्ह्यात प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने थ्री टायर सिस्टीमप्रमाणे यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. यामध्ये कोवीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोवीड केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोवीड केअर हॉस्पीटल या प्रमाणे ही यंत्रणा कार्यरत असून खामगाव, शेगाव आणि बुलडाणा येथे तीन आयसोलेशन कक्षही उभारण्यात आले आहेत. प्रामुख्याने कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण हे बुलडाणा येथे ठेवण्यात येत आहेत.
या व्यतिरिक्त जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेसाठी वर्तमान स्थितीत वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, मास्क तथा तत्सम यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यात परप्रांतातून आलेल्या चार हजार १९२ मजुरांसाठी तब्बल ४० कॅम्प उघडण्यात आलेले असून सातत्याने गेल्या एक महिन्यापासून त्यांना कॅम्पमध्ये समुपदेशनही करण्यात येत आहे.
१३३५ पीपीई किट
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यात सध्या १३३५ पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) सध्या उपलब्ध आहेत. सोबतच एन ९५ व तत्सम चांगले असे चार हजार १८५ मास्क उपलब्ध करण्यात आलेले असून १३ व्हेंटीलेटरचीही जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.
२२८ युनीट रक्त उपलब्ध
उन्हाळ््यात साधारणत: रक्ताची उपलब्धता कमी असते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर आतापर्यंत आठ कॅम्प घेण्यात येऊन त्याद्वारे २२८ युनीट रक्त उपलब्ध करण्यात आलेले आहे. गरजेनुसार आणखी रक्ताची गरज पडल्यास रक्तदान शिबीर घेऊन ते उपलब्ध करण्यात येईल. यादृष्टीनेह प्रशासकीय पातळीवर नियोजन आहे