CoronaVirus in Buldhana : क्लस्टर कंटेन्मेंट झोनमध्ये दुर्धर आजारांचे ५५३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:47 AM2020-04-19T11:47:50+5:302020-04-19T11:48:15+5:30
८५ हजार लोकसंख्येमध्ये ५५३ व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील दहा कंटेन्मेंट झोनमध्ये आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षण पथकाकडून नियमीतपणे नागरिकांची तपासणी करण्यात येत असून या तपासणीदरम्यान ८५ हजार लोकसंख्येमध्ये ५५३ व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचे समोर आले आहे.
परिणामी आरोग्य पथकांमधील ६४ डॉक्टरांकडून अशा व्यक्तींच्या स्वास्थ्यावरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रारंभी बुलडाणा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळला तेव्हा कंटेन्मेंट झोनमधील अवघ्या २४ हजार ८१५ व्यक्तींचे दररोज वैद्यकीय निरीक्षण केले जात होते. मात्र नंतर जिल्हयात टप्प्या टप्प्याने रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यामुळे वर्तमान स्थितीत ८५ हजार ५६९ नागरिकांचे सध्या निरीक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या २.९५ अर्थात तीन टक्के लोक राहत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या संदर्भाने त्यांच्या आरोग्याची नियमित स्वरुपात माहिती संकलीत केल्या जात आहे.
३२६ पथके त्यासाठी कार्यरत असून त्यामध्ये ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी आणि कम्युनिटी हेल्थ आॅफीसरचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोना संदर्भाने या कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांमध्ये काही लक्षणे तर आढळत नाही ना? याची प्रामुख्याने तपासणी केली जाते. बुलडाणा येथे मिर्झानगर, जुना गाव, चिखली येथे बागवानपुरा, देऊळगाव राजा येथे हकीम कॉलनी, डॉ. आंबेडकर नगर, खामगावमधील चितोडा, शेगावमधील इदगाह परिसर, सिंदखेड राजामधील कुरेशी गल्ली, मलकापूरमधील गांधी चौक, स्टेशन रोड, तहसिल कार्यालय परिसर हे दहा क्लस्टर कंटेन्मेंट झोन आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात कम्युनिटी हेल्थ आॅफीस म्हणून ८० डॉक्टरांची आरोग्य विभागाने आता नियुक्ती केली आहे. कंत्राटीपद्धतीने त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दहा क्लस्टर कंटेन्मेंट झोनमध्ये ३२६ पथकांद्वारे होत असलेल्या सर्वेक्षणात त्यांची महत्त्वपूर्ण मदत मिळत असल्याचे जिल्हा प्रशासनातील एका अधिकाºयाने सांगितले. यासंदभातील प्रक्रिया मार्च महिन्याच्या मध्यावरच सुरू होती. त्यानंतर या डॉक्टरांची नियुक्ती झाली
दहा कंटेन्मंट झोनमधील दुर्धर आजार असणाºया व्यक्तींमध्ये चिखली येथील १५१, देऊळगाव राजातील २६८ आणि मलकापूरमधील १३४ व्यक्तींचा समावेश आहे. बुलडाणा, सिंदखेड राजा, खामगाव तालुक्यातील चितोडा, शेगाव आणि मलकापूरमधील स्टेशन रोड, तहसिल कार्यालय परिसरात दुर्धर आजार असणाºया व्यक्ती सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या नसल्याचे या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.