CoronaVirus in Buldhana : दररोज सरासरी दोन रुग्णांची भर; २६ दिवसात ५८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:02 AM2020-06-07T11:02:20+5:302020-06-07T11:02:32+5:30
गत २६ दिवसात सरासरी दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे संक्रमण गेल्या २६ दिवसापासून वाढत असून कोरोना बाधीत रुग्ण वाधीचा वेग दुप्पट झाला आहे. १० मे रोजी २४ कोरोना बाधीत रुग्ण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सहा जून रोजी हा आकडा ८३ वर पोहोचला आहे. त्यामुळे गत २६ दिवसात सरासरी दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
मेहकर व लोणार हे दोन तालुके जर वगळले तर बुलडाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यात कारोना संसर्गाचा प्रवेश झाला आहे. यात प्रामुख्याने एकट्या मलकापूर शहर व तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या २१ वर पोहोचली आहे. खामगावमध्ये हा आकडा १६ वर असून बुलडाणा शहरात कोरोना रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. देऊळगाव राजात तीन, चिखलीत चार, सिंदखेड राजात सात, शेगावमध्ये पाच, जळगाव जामोदमध्ये दोन, मोताळ््यात आठ, नांदुऱ्यामध्ये पाच तर संग्रामपूरमध्ये एक कोरोना बाधीत रुग्ण सापडलेला आहे. आतापर्यंत ५० रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ३३ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे पुणे, मुंबई व अकोला जिल्ह्यातून आलेले आहेत. मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रासह, मुंबईमधून बुलडाणा जिल्ह्यात जवळपास एक लाखापेक्षा अधिक नागरिक जिल्ह्यात स्वगृही परतले होते. या दरम्यानच बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्यास प्रारंभ झाला आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आता बुलडाण्याची वाटचाल ही १०० रुग्णांच्या दिशेने सुरू झाली आहे. जुलै महिन्यातही बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्यने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
परदेशातून आलेला एक पॉझिटिव्ह
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या ६८ दिवसात तब्बल ७०३ नागरिक विदेशातून स्वगृही परतले आहेत. पैकी फिलिपाईन्समधून आलेला बुलडाण्यातील एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. सध्या तो कोरोना मुक्त झाला आहे. चार जून रोजी कतार आणि हाँगकाँगमधून दोन जण बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतले आहेत. त्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटीन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा जसजसा वाढत आहे तसतशी प्रतिबंधीत क्षेत्राचीही संख्या वाढत आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या ३८ झाली असून या प्रतिबंधीत क्षेत्रात जवळपास दीड लाख नागरिक राहतात. त्यांचे आरोग्य सर्व्हेक्षणही नियमितपणे करण्यात येत असून यातील सात प्रतिबंधीत क्षेत्रात २८ दिवसात एकही रुग्ण आढळून न आल्यामुळे ही सातही प्रतिबंधीत क्षेत्रे शिथील करण्यात आली आहे. नॉन रेड झोनसाठी घालून दिलेले नियम येथे सध्या पाळण्यात येत आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधीतांपैकी १२ बाधीत हे दिल्ली येथील कार्यक्रमातून आले होते तर ७० कोरोना बाधीत जिल्ह्यातील असून यापैकी बहुतांश व्यक्ती या पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतून जिल्हत स्वगृही परतलेल्या आहेत. विदेशातून आलेल्या ७०३ नागरिकांपैकी एक कोरोना पॉझिटिव्ह असलेला युक हा फिलिपाईन्समधून जिल्ह्यात आला होता. सध्या जिल्ह्यात ३३ कोरोना बाधीत व्यक्तींवर तीन आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहे.