CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १९ जण ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:56 PM2020-12-27T12:56:24+5:302020-12-27T12:56:36+5:30
CoronaVirus in Buldhana: मेहकर तालुक्यातील एका ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३६९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३५० जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून, १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, मेहकर तालुक्यातील एका ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४९ वर पोहोचली आहे.
शनिवारी बाधित आढळून आलेल्यांमध्ये खामगाव सात, देऊळगाव राजा पाच, चिखली एक, नांदुरा एक, सावंगी टेकाले एक, जळगाव जामोद एक, मलकापूर एक, बुलडाणा एक, दहीदमधील एकाचा यात समावेश आहे. यासोबतच उपचारादरम्यान मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे शनिवारी ४१ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा कोविड केअर सेंटरमधून नऊ, शेगावमधून सात, देऊळगाव राजातून तीन, खामगावमधून नऊ, चिखलीमधून सहा, नांदुऱ्यातून दोन आणि मलकापूर कोविड केअर सेंटरमधील पाच जणांचा समावेश आहे.
कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२,३५३ वर!
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८६ हजार ५१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तर ११ हजार ८९० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२,३५३ झाली असून, यापैकी ३१४ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप ११८५ अहवालाची प्रतीक्षा आहे.