CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; आठ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:00 AM2020-06-23T11:00:24+5:302020-06-23T11:00:48+5:30
जिल्ह्यातील कोरोने मृत्यूची संख्या आठवर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात आणखी आठ कोरोना पॉझिटिव्ह २२ जून रोजी आढळून आले असून मलकापूरातील एका मृत व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोने मृत्यूची संख्या आठवर पोहचली आहे. एकूण १६५ कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत. मोताळा, मलकापूर, नांदूरा व खामगाव तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
कोरोना बाधितांचा आकडा आता झपाट्याने वाढत आहे. २२ जून रोजी ९१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आठ अहवाल पॉझिटिव्ह आहे. मोताळा तालुक्यातील धामणगांव बढे येथील २२ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, पाच वर्षाची मुलगी व ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहेत. तसेच मलकापूर येथील ५२ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय वृद्ध महिला, नांदुरा येथील ३७ वर्षीय महिला व समर्थ नगर खामगांव येथील ५३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मलकापूर येथील १९ जून रोजी दाखल ५२ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला होता. या मयत रूग्णाचा कोरोना अहवालही पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे रविवार सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यात आठ पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्याची मृत्यूसंख्या आठ झाली आहे.
जिल्ह्यामध्ये मलकापूर व संग्रामपूर तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली व बुलडाणा तालुक्यात सध्या एकही क्रीयाशील कोरोना रूग्ण नसल्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त आहे. मलकापूर येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची संचारबंदी पाळण्यात येत आहे.
आतापर्यंत २ हजार २४५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १६५ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी आठ मृत आहे. आतापर्यंत १२२ कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)