CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:19 AM2020-08-28T11:19:44+5:302020-08-28T11:19:54+5:30
जिल्ह्यात ६२ जण कोरोनाबाधीत आढळून आले असून एकुण कोरोना बाधीतांची संख्या २,८०६ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोवीडमुळे बुलडाणा शहर परिसरातील दोघांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत कोवीडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरूवारी जिल्ह्यात ६२ जण कोरोनाबाधीत आढळून आले असून एकुण कोरोना बाधीतांची संख्या २,८०६ झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ४६३ जणांचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. यापैकी ४०१ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र बुलडाणा शहरातील ८२ वर्षीय व्यक्ती व लगतच्या सागवन येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे बुलडाणा शहरातही कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जवळपास सहा जणांचा आतापर्यंत बुलडाणा शहर परिसरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, अन्य जिल्हयांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचा मृत्यूदर हा कमी असून तो अवघडा दीड टक्के आहे, हे जिल्ह्यासाठी समाधान म्हणावे लागेल.
दुसरीकडे गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये खामगावमधील आठ, कदमापूर येथील एक, शेगाव येथील १३, चिंचखेड येथील एक, तिव्हाण येथील एक, सागोन येथील एक, मोताळा येथीलही एक, तपोवन येथील तीन, देऊळगाव राजा येथील चार, कारखेडा येथील एक, किन्ही सवडत येथील एक, जांभोरा (चिखली) येथील एक, किनगाव राजा येथील एक, वाघाळा येथील दोन, लोणार येथील दोन, बिबी येथील दोन, बुलडाण्यात सहा, धाड एक, सावरगाव एक, सागवन एक, मेहकर दोन, जानेफळ एक, मलकापूर एक या प्रमाणे ६२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
गुरूवारी २७ जणांनी कोरोनावर मात केली. त्यात बुलडाणा सात, साखरखेर्डा दोन, खामगाव नऊ, शेगाव दोन, जलंब दोन, धामणगाव बढे, चिखली, निमखेड , किन्ही सवडत येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
१६,४१९ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह
जिल्ह्यातील १६ हजार ४१९ संदिग्धांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा आहे. दरम्यान आतापर्यंत बाधीत रुग्णांपैकी १,९६८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण कोरोना बाधीतांची संख्या आता २,८०६ झाली असून प्रत्यक्षात ७९४ बाधीत व्यक्तीवर सध्या उपचार करण्यात येत आहेत.