CoronaVirus in Buldhana : आणखी पाच पॉझिटिव्ह ; एकूण रूग्ण संख्या ३५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:51 AM2020-05-21T10:51:29+5:302020-05-21T10:51:37+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ३५ झाली असून सात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव: जिल्ह्यात बुधवारी पुन्हा पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये शेगाव येथील सफाई कर्मचाऱ्याची पत्नी, मोताळा तालुक्यातील आव्हा येथील युवकासह आलमपूर येथील एका व्यक्तीसह जळका भडंग येथील युवक,खामगाव तालुक्यातील उमरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता ३५ झाली असून सात रुग्णांवर सध्या शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तीन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुसरीकडे २० मे रोजी सकाळी शेगाव येथील सफाई कर्मचाºयाची पत्नी पॉझिटिव्ह आढळून आली. त्या पाठोपाठ मोताळा तालुक्यातील आव्हा गावातील एक २२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. १२ मे रोजी भांडूप परिसरातून आठ व्यक्तींसमवेत तो गावी आला होता.१३ मे रोजी त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास लिहा बुद्रूक व नंतर पिंपळगाव देवी येथे नेण्यात आले होते. तेथून नंतर त्याला बुलडाणा हलविण्यात आले होते. त्याचा अहवाल २० मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह काही नातेवाईक असे एकूण नऊ जण व खामगाव तालुक्यातील दधम येथील संपर्कातील पाच जणांना आरोग्य विभागाने तापासणीसाठी ताब्यात घेतले आहे. शेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. मात्र सफाई कामगाराची पत्नी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तिच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.
खामगाव तालुक्यात दोन पॉझिटिव्ह!
खामगाव: बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालात खामगाव तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये जळका भंडग, उमरा येथील व्यक्तीचा समावेश आहे. येथील २५ वर्षीय युवक पॉझिटीव्ह आढळून आला. प्रशासनाच्यावतीने जळका भंडग सील करण्यात आले आहे. खामगाव शहरातील १४ जणांचा अहवाल निगेटीव्ह आढळून आल्याने बुधवारी सकाळी खामगावकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अलमपुरातील युवक पॉझिटिव्ह; उपचार सुरू
नांदुरा: शहरालगत असलेल्या अलमपूर येथील एक जण बुधवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यावर खामगाव येथील कोवीड रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी हा व्यक्ती मुंबईतून आलमपूर येथे आला होता. एकच दिवस तो गावात थांबला होता. मात्र त्याला त्रास होऊ लागल्याने लगोलग त्याला खामगाव येथील कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, गाव सील करण्याच्या दृष्टीने नांदुºयातील आरोग्य विभाग आलमपूरमध्ये दाखल होत असून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा ते शोध घेत आहेत.