CoronaVirus in Buldhana : नऊ दिवसात २४ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:50 AM2020-06-10T10:50:36+5:302020-06-10T10:50:46+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लागण सुरूच असून जून महिन्यात ९ दिवसात २४ जणांना लागण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लागण सुरूच असून जून महिन्यात ९ दिवसात २४ जणांना लागण झाली आहे. तर गेल्या ३० दिवसात जिल्ह्यात ६९ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या संक्रमणाचा वेग जिल्ह्यात वाढला आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी पातुर्डा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ९३ रूग्ण असून यापैकी २९ रूग्णांवर सद्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिन रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे ६१ रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २८ मार्च रोजी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला होता. पश्चिम वºहाडातील हा पहिलाच मृत्यू असल्याने बुलडाणा जिल्हा चर्चेत आला होता. मात्र त्यानंतर आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या पथकांव्दारे कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रो अॅक्टीव पध्दतीने हाती घेण्यात आल्यामुळे जिल्ह्यात संक्रमीत रूग्ण शोधण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ९३ रूग्ण जरी दिसत असले तरी जिल्ह्याची स्थिती लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.
मंगळवारी पातुर्डा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. सद्या तो शेगाव येथील आयसोलेशन कक्षात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळापूर येथे तो काही दिवसाअगोदर गेला होता. परत आल्यानंतर निमोनियाचा त्रास त्याला सुरू झाला. दुसरीकडे मलकापूर येथे शहरातील नागरिकांचे सर्व्हेक्षण सुरू झाले असून ९ जून रोजी शहरातील ४ हजार कुटुंबातील १८ हजार नागरिकांचे आरोग्य विषयक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये १६८ व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
८ जणांना ‘डिस्चार्ज’
मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या ८ जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापूर मधील ५, शेलापूर येथील २ आणि साखरखेर्डा येथील एकाचा समावेश आहे. सुटी झालेल्यांमध्ये ४ महिला, १ युवती आणि ३ पुरूषांचा समावेश आहे. बुलडाणा शहरात मच्छी ले आऊटमध्ये एक जण सोमवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे हा परिसर सील केला.
२६ अहवाल निगेटिव्ह
मंगळवारी २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला असला तरी पातुर्डा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे.