CoronaVirus in Buldhana : सॅनिटायझरसह मास्क, हॅन्ड ग्लोजचा काळाबाजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:49 AM2020-04-06T10:49:12+5:302020-04-06T10:50:06+5:30
सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोजचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना आल्यापासून सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज आदी साहित्याच्या दरामध्ये तब्बल ६० टक्क्याने वाढ झाली आहे. दोन महिन्यातील ही वाढ बघता सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोजचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वच साहित्याचा जिल्ह्यात तुटवडा आहे. अन्न, औषध प्रशासनाच्या तपासणीतही मेडिकलवर मास्क सापडले नसल्याची माहिती आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून प्रत्येकजण सॅनिटायझर, मास्क खरेदी करीत आहे. सोबतच हॅन्ड ग्लोजची मागणीही वाढली आहे. सध्या जिल्ह्यात मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. सॅनिटायझर, हॅन्ह ग्लोजचीही तीच परिस्थिती आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भावाह येण्यापूर्वी मास्क, सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोजच्या दरावर प्रकाश टाकला असता आता तब्बल ६० ते ७० टक्क्याने या साहित्याचे दर वाढविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये कपंनीकडूनच हे दर वाढविण्यात आल्याचे दिसून येते.
२० रुपयांचे सर्जिकल ग्लोज ८० रुपयांवर
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सर्जिकल ग्लोल २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री केले जात होते. त्याचे दर आता साधारणत: ८० रुपयांपेक्षाही अधिक आहेत. पूर्वी सर्जिकल ग्लोज वापरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. आता त्याची मागणी वाढली आहे.
मास्कचे दरही चिंताजनक; एन ९५ मास्कचे दर ३०० रुपयांच्या वर
मेडिकल एजन्सीवर पूर्वी २ ते ३ रुपयांपर्यंत मास्क मिळत होते. आता कंपन्यांनीच त्याची किंमत १५ ते २० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळे ग्राहकाच्या हातात मास्क येईपर्यंत त्याची किंमत ३० ते ४० रुपये होते. मास्कच्या दरातही चिंताजनक वाढ होत आहे. एन ९५ मास्कचे दर थेट ३०० रुपयांच्यावर पोहचले आहे.