CoronaVirus in Buldhana : दहा स्थलांतरीत कोरोना ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:40 AM2020-05-25T10:40:37+5:302020-05-25T10:40:46+5:30
पुणे, मुंबईस अकोला जिल्ह्यातून स्वगृही आलेल्या नागरिकांपैकी दहा जण कोरोना बाधीत निघाले आहेत.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लॉकडाउन तीन व चारदरम्यान मिळालेल्या शिथीलतेमुळे बुलडाणा जिल्ह्यात पुणे, मुंबईस अकोला जिल्ह्यातून स्वगृही आलेल्या नागरिकांपैकी दहा जण कोरोना बाधीत निघाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नियंत्रणात असलेला कोरोना संसर्ग आता अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात १६ मे पर्यंत पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह जवळपास राज्यातील २५ जिल्ह्यातून ७२ हजाराच्या आसपास नागरिक स्वगृही परतले होते. आता हा आकडा जवळपास लाखाच्या घरात गेला असून या स्थलांतरीतामधीलच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रारंभी बुलडाणा जिल्ह्यात चितोडा गावाचा अपवाद वगळता सर्वच कोरोना बाधीत रुग्ण हे शहरी भागात असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र स्थलांतरीतांचा आकडा जसजसा वाढत आहे. तस तसा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचाही आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे हे स्थलांतर जिल्हा प्रशासन कोरोनाला नियंत्रीत करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना बहुतांशी मारक ठरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यन, त्यानंतरही महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे या कोरोना बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग करण्याचे कसब वाखाणण्या जोगे म्हणावे लागेल. गेल्या दोन महिन्याच्या अनुभवातून हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट ओळखून आरोग्य विभागाकडून संदिग्धांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहे. त्यामुळे यात बहुतांशी अचुकता येत असल्याचे चित्र आहे.
दहा जणांच्या संपर्कात आलेल्या तब्बल १९३ जणांना संदिग्ध रुग्ण म्हणून प्रशासनाने आरोग्य विभागाच्या स्वाधीन केले असून त्यांच्या चाचण्या घेण्यात येत असून निगेटीव्ह चाचण्या आलेल्याां मेडिकल प्रोटोकॉनुसार होम क्वारंटीनचा सल्ला देवून घरी सोडण्यात येत आहे. दरम्यान बाहेर गावाहून आलेल्यांमुळे जिल्ह्यात काहींना संक्रमण ही होत आहे. जळगाव जामोद येथील एकामुळे असेच संक्रमण झाले असून अद्याप जवळपास १०५ संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास मिळालेले नाहीत. त्यानंतर प्रत्यक्षात एकंदरीत संक्रमणाची जिल्ह्यातील स्थिती स्पष्ट होईल.
या उपरही प्रशासकीय पातळीव मे महिन्याच्या मध्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात समुह संक्रमणाचा मोठा धोका होऊ शकतो, असे संकेत यापूर्वी दिल्या गेले होते. मात्र प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जिल्हा परिषद व आरोग्य विभागाची सर्व्हीलन्स पथके, पोलिस प्रशासनाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मिळणारे सहकार्य यामुळे बुलडाण्यातील स्थिती लगतच्या अकोला, बºहाणपूर, जळगाव खांदेश, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या तुलनेत बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.
बाधीतांच्या संपर्काने एकूण १३ जण संक्रमीत
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी आधीच्या कोरोना बाधीतांमुळे १३ जण संक्रमीत झाले असल्याच्या नोंदी प्रशासकीय पातळीवर आहे. बुलडाण्यात मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णापासून चार जणांना, सहाव्या व सातव्या बाधीतापासून, ११ व्या पासून दोन, १७ व्या रुग्णापासून तीन जणांना तर ३० व्या रुग्णापासून एकाला कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याच्या नोंदी आहेत. दरम्यान या ३७ जणांंच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील ५७१ व्यक्तींच्याही चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश जण निगेटिव्ह आले असले तरी अद्यापही १०५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे रविवारी ३२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बुलडाण्यातील पहिल्या कोरोना बाधीताच्या संपर्कात तब्बल ८१ व्यक्ती आल्या होत्या. त्या सर्वांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात जिल्हा प्रशासनास यश आल्याने स्थिती नियंत्रणात राहली.