CoronaVirus in Buldhana : दहा जणांचा अहवाल 'निगेटीव्ह'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:23 PM2020-04-04T16:23:55+5:302020-04-04T16:24:08+5:30
दहा जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.
बुलडाणा: कोरोना संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ३० संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यापैकी दहा जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.
दोन आणि तीन एप्रिल रोजी दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३० जणांचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान उर्वरित २० जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते आल्यानंतर एकंदर चित्र स्पष्ट होईल.
बुलडाणा जिल्ह्यातून पाच मार्च पासून आजपर्यंत एकूण ८३ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापयंत ६३ जणांचे स्वॅब नमुने प्राप्त झाले आहेत. कालपर्यंत ही संख्या ५३ होती. दरम्यान, यापैकी पाच जणांचे रिपोर्ट हे पॉझीटीव्ह आले होते. त्यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण हे मृत व्यक्तीच्या निकट संपर्कातील होते. ते सध्या आयसोलेशन कक्षात आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे शनिवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत संदिग्ध म्हणून गणल्या गेलेल्या ११२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी शंका आलेल्या ८३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. त्यातील २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यातील १२ नागरिक हे आयसोलेशन वॉर्डमध्ये (अलगीकरण कक्ष) आहेत. यातील सात जण बुलडाणा येथील, तीन जण खामगाव येथील तर दोन जण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहेत.
१२७ जणांना सुटी
जिल्ह्यात ११ मार्च पासून खºया अर्थाने कोरोना संसर्गाच्या संदर्भाने प्रशासन अधिक संवेदनशील झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत होम क्वारंटीन, हॉस्पीटल क्वारंटीनमध्ये असलेल्या १०९ लोकांना तर आयसोलेशन कक्षात असलेल्या १८ जणांना अशा एकूण १२७ जणांना सुटी देण्यात आली आली आहे.