CoronaVirus in Buldhana : आणखी तिघांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:47 AM2020-04-24T10:47:26+5:302020-04-24T10:47:38+5:30
यामध्ये शेगाव येथील दोन तर खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एकाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाविरोधातील लढाई बुलडाणा जिल्हा जिंकण्याच्या उंबरठ्यावर बुलडाणा जिल्हा पोहोचला असून गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यातील आणखी तीन कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना गुरूवारी येथील स्त्री रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये शेगाव येथील दोन तर खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एकाचा समावेश आहे.
त्यामुळे आजच्या घडीला एक प्रकारे खामगाव तालुक्यातील चितोडा आणि शेगाव शहर कोरोना मुक्त झाल्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे शेगाव शहरातील एका पाच वर्षाच्या मुलानेही कोरोनावर मात केली आहे. बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात तब्बल १४ दिवस क्वारंटीनमध्ये काढण्याचे मोठे कसबही या मुलाने दाखवले आहे. त्याला व त्याच्या आईलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे आईच्या सानिध्यात आयसोलेशन कक्षात १४ दिवस काढण्यात तो यशस्वी ठरला. चितोडा व शेगाव येथील या तिघांचेही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांना सुटी देण्यात आली असून १४ दिवस आता घरातच त्यांना क्वारंटीन रहावे लागेल.
दरम्यान, प्रसंगी २४ एप्रिल रोजी बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयातून आणखी दोघांना सुटी होण्याची शक्यता आहे. त्यांचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्यास मेडीकल प्रोटोकॉल नुसार त्यांना सुटी दिली जावू शकते. सरता आठवडा हा बुलडाणा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. संपलेल्या आठवड्यात १७ एप्रिल रोजी ३, २० एप्रिल रोजी ५ आणि २३ एप्रिल रोजी तिघांना कोरोना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)