CoronaVirus in Buldhana : आणखी २० जणांचे 'स्वॅब' नमुने पाठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:33 PM2020-04-15T17:33:07+5:302020-04-15T17:33:13+5:30
जवळपास २० जणांचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
बुलडाणा: विदर्भात नागपूरनंतर बुलडाणा जिल्हा कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे. दरम्यान, १४ एप्रिल रोजी पॉझीटीव्ह आढळलेल्या चौघांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील जवळपास २० जणांचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील नागरी भागात राहणाऱ्या सहा लाख लोकसंख्येला घरपोच अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू असून प्रसंगी त्यासंदर्भातील संकेतस्थळ हे १६ एप्रिल रोजी कार्यान्वीत होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही २१ वर पोहोचली असून बुलडाणा शहरात सहा (मृत्यू एक) आणि मलकापूरमध्ये चार या प्रमाणे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती आहे. त्या खोलोखाल शेगाव तीन, चिखली तीन तर देऊळगाव राजा आणि खामगाव येथे प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आहेत. सिंदखेड राजा येथे एका व्यक्तीला कोरोनाची लागन झालेली आहे. परिणामी जिल्हा प्रशासन सध्या अलर्टवर असून हायरिस्क झोनमध्ये राहणाºया ६० हजार २६१ नागरिकांची दररोज वैद्यकीय तपासणी व विचारपूस करण्यात येत आहे.
दरम्यान १५ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातून २० जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. यामध्ये मलकापूर येथील पॉझीटीव्ह आलेल्या तीन व बुलडाणा येथील पॉझीटीव्ह आलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचा समावेश आहे. यातील मलकापूर येथील ४२ वर्षीय व्यक्ती हा प्रारंभी पॉझीटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरापासून बराच दुर राहत असल्याने त्याच्या संपर्कातील काही व्यक्तींचा यात समावेश आहे. सोबतच बुलडाणा येथील व्यक्तीच्याही संपर्कातील काहींना क्वारंटीन करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दुसरीकडे काल पाठविलेल्या १२ स्वॅब नमुन्यांपैकी पाच नमुन्यांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पालिका क्षेत्रामध्ये घरपोच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून साडेपाच लाख ते सहा लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येला त्याचा लाभ होईल.
'त्या' चौघांची आयसोलेशन कक्षात रवानगी
१४ एप्रिल रोजी पॉझीटीव्ह आलेल्या चौघाही जणांची आयसोलेशन कक्षात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या आयसोलेशन कक्षात (अलगीकरण कक्ष) एकूण ३१ व्यक्ती असून यात बुलडाणा येथे २६, खागावमध्ये तीन आणि शेगाव येथे दोन व्यक्तींना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेले आहे.