CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:34 AM2020-03-31T10:34:26+5:302020-03-31T10:36:23+5:30
यामध्ये ६५ वर्षीय वृद्ध आणि १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
बुलढाणा: दोन दिवसापूर्वी बुलढाणा शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी दोघांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. बुलडाण्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता एक मृतकासह ३ झाली आहे. यामध्ये ६५ वर्षीय वृद्ध आणि १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे. यामुळे बुलडाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बुलडाणा येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू शनिवारी झाला होता. या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास ६६ जणांना सध्या मॉनिटरिंग करण्यात येत आहे. यापैकी बत्तीस जणांचे नमुने तपासणीसाठी ३० मार्च रोजी पाठवण्यात आले होते. त्यातील दोघांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना संसर्गामुळे बुलडाण्यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे बुलडाणा शहर परिसरात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड (समुह संक्रमाण) होण्याचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलडाण्यात नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जवळपास ४० पथके नियुक्त करण्यात आले असून हाय रिस्क झोनमधील नागरिकांच्या घरोघरी जावून ही तपासणी करण्यात येत आहे. सोबतच मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर ही वैद्यकीय सुरक्षेच्या दृष्टीने पाळत (सर्व्हीलन्स) ठेवणे सुरू केले आहे. दरम्यान, २९ मार्च रोजी मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना पोलिस, आरोग्य व महसूल प्रशासनाने कोंबींग आॅपरेशन करून ताब्यात घेत बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील हॉस्पीटल क्वारंटीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ६६ जणांचा समावेश असून त्यापैकी ३० जणांचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासोबतच काहींचे स्क्रीनींगही करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त मृत व्यक्ती किती जणांच्या संपर्कात होती याचीही माहिती काढण्यात येत आहे.