CoronaVirus in Buldhana : बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी ‘अल्टिमेटम’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:59 AM2020-03-28T10:59:17+5:302020-03-28T10:59:23+5:30
खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून बाहेरगावहून आलेल्यांची तपासणी तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिलेत. खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र, रोजगारासाठी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, अहमदनगर यासारख्या महानगरात तर गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि सूरत येथील सुमारे २५ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी जिल्ह्यात प्रवास केला. खामगाव तालुक्यातील ९७ गावांमध्ये तब्बल साडेतीन हजारापेक्षा जास्त नागरिक बाहेरगावहून दाखल झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी अनेकांनी आपल्या दुचाकी आणि खासगी वाहनांचा वापर केला. बाहेरगावहून आलेल्यांची पंचायत समिती प्रशासनाकडून माहिती संकलित केल्या जात आहे. सोबतच पंचायत समितीकडून आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी त्यांचा अद्ययावत डाटा दिला जात आहे. दरम्यान, खात्रीलायक माहितीनुसार खामगाव तालुक्यातील सुमारे एक हजार आणि जिल्ह्यातील ९ हजार नागरिकांची तपासणी अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.