CoronaVirus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना उद्रेक टाळण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:30 AM2020-05-27T11:30:20+5:302020-05-27T11:30:34+5:30
महसूल, आरोग्य, पोलिस आणि सर्व्हीलन्स करणारे जिल्हा परिषदेची पथके यांचा आपसी समन्वय महत्त्वपूर्ण ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ४८ च्या घरात गेली असली तरी त्याचा उद्रेक रोखण्यामध्ये बुलडाणा जिल्हा प्रशासनास गेल्या दोन महिन्यात बऱ्यापैकी यश आले आहे.
प्रामुख्याने यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि सर्व्हीलन्स करणारे जिल्हा परिषदेची पथके यांचा आपसी समन्वय महत्त्वपूर्ण ठरत आहे. नाही म्हणायला गेल्या १६ दिवसात बुलडाणा जिल्ह्यात २४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असले तरी बहुतांश कोरोना बाधीत हे रुग्ण हे पुण्या-मुंबईतून बुलडाणा जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्यात येथे आल्यानंतर लक्षणे दिलसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना थेट आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. परिणामी जेथे प्रशासकीय पातळीवर बुलडाणा जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक होण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. तेथे जिल्ह्यातील ही संख्या ४८ वर मर्यादीत राहली आहे. आज घडीला जिल्ह्यातील २२ प्रतिबंधीत क्षेत्रात नियमित स्वरुपात होणारा सर्व्हे आणि दुर्धर आजाराच्या व्यक्तींसह सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची माहिती संकलीत करून जेथे संशय आहे, अशांना तातडीने वैद्यकीय उपचार व सल्ल्यासाठी पाठविण्याचे योग्य नियोजन यामुळे जिल्ह्यात सध्या तरी स्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जुन, जुलै मध्ये कोरोना संसर्गाचा प्रसंगी जिल्ह्यात उद्रेक होण्याची भिती व्यक्त होत असून प्रशासकीय पातळीवर तसा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. सध्या जिल्ह्यात प्रत्यक्षात १८ प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व्हेक्षण व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह शहरी भागातील आरोग्य केंद्रामध्येही बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत असून जिल्ह्यात अलिकडील काळात आलेल्या एक लाख नागरिकांपैकी ९० टक्के नागरिकांची तपासणी करण्यात आली असल्याचे प्रशासकीय आकडेवारी सांगते.
पोलिसांची छोटी डायरी ठरतेय उपयुक्त
बुलडाणा पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाºयाकडे छोटी डायरी देण्यात आली असून त्यांनी कोठे-कोठे भेटी दिल्या याची नोंद प्रत्येक पोलिस कर्मचारी घेत आहे. त्यामुळे प्रसंगी एखाद्या पोलिस कर्मचाºयाला बाधा झाल्यास त्याचे मूळ शोधणे पोलिसांना शक्य होत आहे.
हाय रिस्क कॉन्टॅक्टवर लक्ष
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत अनुभवातून प्रशासकीय पातळीवर तथा वरिष्ठस्तरावरून आलेल्या सुचनांनंतर हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्यांना बाधीताकडून कोरोना होण्याचा धोका असतो. त्यानुषंगाने प्रशासकी पातळीवर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तीचा योग्य पद्धतीने शोध घेण्याचे कसब अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही त्याची मदत मिळत आहे.