CoronaVirus : बुलडाण्यात कोरोनाचा संशयीत रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 04:32 PM2020-03-14T16:32:19+5:302020-03-14T16:32:25+5:30
शुक्रवारी हा संशयीत रुग्ण सौदी अरेबियातून आला होता.
बुलडाणा: सर्दी व तापाची लक्षणे असलेला कथितस्तरावरील कोरोनाचा संशयीत रुग्णाला बुलडाणा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी हा संशयीत रुग्ण सौदी अरेबियातून आला होता.
दरम्यान, ताप आणि सर्दीची लक्षणे त्याच्यामध्ये आढळल्यामुळे त्यास बुलडाणा येथील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टीकोणातून ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयीन सुत्रांनी दिली. या रुग्णाचे नमुने हे नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून १५ मार्च रोजी सायंकाळी किंवा १६ मार्च रोजी दुपारपर्यंत त्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट होईल, असे सुत्रांचे म्हणणे आहे. तुर्तास खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीकोणातून ही एक रुटीन प्रोसेस आहे, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील सात जणांचे स्क्रीनींग आपण केलेले आहे. त्यात एकही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना स्पष्ट केले.
सौदी अरेबिया येथून शुक्रवारी हा रुग्ण चिखली येथे त्याच्या घरी आला होता. तो कुटुंबाच्या कोणाच्या फारसा संपर्कात आलेला नाही. मात्र त्या उपरही त्याच्या कुटुंबातील सदस्यांना होम कोरोनटाईनवर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या बाबत भीती बाळगू नये. प्रत्यक्ष अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार काय हे स्पष्ट होईल. सर्दी व तापाची लक्षणे या व्यक्तीत आढळल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या व्यक्तीस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या रुग्णाच्या स्वॅपचे नमुने घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाचा एक कर्मचारी नागपूरसाठी रवाना झाला आहे. ह्यहार्ड अॅन्ड फास्टह्ण तत्वावर रविवारी सायंकाळ पर्यंत या रुग्णाचे नमुने तपासून तसा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयास थेट इ-मेलवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सध्या विलगीकरण कक्षात दाखल असलेला रुग्ण हा केवळ संशयीत असल्याने व खबरदारीचा उपाय म्हणून निगराणीखाली ठेवण्यात आला आहे. कोरोनाचा रिस्क पिरेड हा साधारणत: १४ दिवसांचा असतो. त्यामुळे या प्रकरणी नागरिकांनी घाबरून जावू नये, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.