CoronaVirus : प्रतिबंधीत क्षेत्रातील गर्भवती महिलांचीही कोरोना चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:37 AM2020-05-03T10:37:19+5:302020-05-03T10:37:35+5:30
प्रसुतीस पाच दिवस राहलेल्या गर्भवती महिलांची कोरोना चाचणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गीत रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधीत क्षेत्राताली गर्भवती मातांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील ११ प्रतिबंधीत क्षेत्रातील गर्भवती मातांची माहिती आरोग्य विभागाने संकलीत केली असून प्रसुतीस पाच दिवस राहलेल्या गर्भवती महिलांची कोरोना चाचणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
यासंदर्भात केंद्र शासनाने राज्य शासनाला सुचना दिल्या होत्या. गेल्या आठ दिवसापूर्वी याबाबतचे आदेश राज्य शासनाकडून बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यात एकूण ११ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. यामध्ये बुलडाणा शहरात दोन, मलकापूरमध्ये दोन, देऊळगाव राजामध्ये दोन, मलकापूरमध्ये तीन, सिंदखेड राजात एक, शेगावात एक, खामगावमधील चितोडा अशा ११ कंटेन्मेंट झोनमद्ये ९२ हजार ५२६ लोकसंख्येमधून गर्भवती मातांचा शोध सर्व्हेक्षण पथकांनी घेतला असून त्यांच्या संभाव्य प्रसुती दिनांकाची नोंद घेतली आहे.
दरम्यान, संभाव्य प्रसुती दिनांकाच्या पाच दिवस अगोदर अशा महिलांची कोरोना चाचणी करणे राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या अलर्टवर आहे. सोबतच या प्रतिबंधीत क्षेत्रातील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचीही नोंद घेण्यात आली असून सर्दी, ताप असलेल्यांचेही ३५७ वैद्यकीय पथकांद्वारे तपासणी होत आहे. दरम्यान, वर्तमान स्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची लागन ही आटोक्यात आल्याचे चित्र आहे.