coronavirus : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 02:12 PM2020-03-11T14:12:47+5:302020-03-11T14:13:00+5:30
खामगाव, शेगाव व बुलडाणा येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सध्या ‘कोरोना’ आजाराने थैमान घातले आहे. बुलडाण्याला लागून असलेल्या अकोला जिल्ह्यात ‘कोरोना’ संशयीत रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये धास्ती भरली आहे. नागरिकांनी न घाबरता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. संसर्ग टाळण्यासाठी सतर्कता बाळगण्यात येत असून विशेष काळजी घेण्यात येत आहे.
‘कोरोना हा जीवघेणा आजार आहे. या आजारावर आतापर्यंत कोणतेही औषध निघालेले नाही. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध घालणे हाच महत्त्वाचा उपाय सद्य:स्थितीत आल्या हाती आहे. नागरिकांनी या आजाराला घाबरून न जाता संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींचे पालन करण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावे, कच्चे अन्नपदार्थ न खात पूर्णपणे शिजवून खावे आदी गोष्टींची काळजी घेतल्यास संभाव्य धोका निश्चितपणे टाळता येऊ शकतो. सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्वरीत उपचार करून घेणे गरजेचे आहे. संशयीत रुग्णांसाठी जिल्ह्यात खामगाव, शेगाव व बुलडाणा येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘कोरोना’ ची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरीत या ठिकाणी जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
‘कोरोना’ चा संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो हस्तांदोलन करू नये. होळी खेळताना रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा. महाराष्ट्रात आतापर्यंत या आजाराचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगण्याची गरज नाही.
-डॉ. प्रेमचंद पंडित,
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा