CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात सात दिवसात पाच प्रतिबंधित क्षेत्रांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:43 AM2020-05-19T10:43:37+5:302020-05-19T10:43:46+5:30
ग्रीन झोनकडे असलेली जिल्ह्याची वाटचाल पुन्हा जैसे थे च्या स्थितीत आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात एकीकडे प्रारंभीच्या ११ प्रतिबंधित क्षेत्रांची व्याप्ती कमी करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच गत आठवड्यात पाच नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे आणखी पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार झाले आहेत. ग्रीन झोनकडे असलेली जिल्ह्याची वाटचाल पुन्हा जैसे थे च्या स्थितीत आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पहिला रुग्ण २९ मार्च रोजी आढळला. यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २४ वर पोहचला होता. परिणामी ११ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. प्रथम पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना टप्प्याटप्प्याने सुटी देण्यात आली. २४ पैकी एका रुग्णाचा मृत्यू तर उर्वरीत २३ जण या आजारातून पूर्णपणे मुक्त झाले. यामुळे १० मे रोजी बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त होऊन ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू झाली होती. यासोबतच सर्व प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती कमी करण्याबाबत प्रशासनाचे नियोजन होते. मात्र जळगाव जामोद येथील एक व्यक्ती बºहाणपूरला जाऊन आल्यानंतर ११ मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्हावासियांचा आनंद औटघटकेचा ठरला. यानंतर ११ मे ते १७ मे या सात दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात एकुण पाच व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये जळगाव जामोद येथील एका व्यक्तीसह खामगाव, शेगाव, मलकापूर तालुक्यातील नरवेल व सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात पाच प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडली असून आॅरेंज झोनमधील स्थान कायम राहिले आहे.