CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील ८५ हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:25 AM2020-04-18T11:25:30+5:302020-04-18T11:25:41+5:30
दहा कंटेन्मेंट झोनमधील ८५ हजार ५६९ नागरिकांपैकी ७९ हजार नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या दृष्टीने राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी एक हॉटस्पॉट जिल्हा म्हणून समोर आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील तीन रुग्ण हे कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यास एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सात तालुक्यातील दहा कंटेन्मेंट झोनमधील ८५ हजार ५६९ नागरिकांपैकी ७९ हजार नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे.
दरम्यान, बुलडाणा शहरातील पहिल्या तीन कोरोना बाधीत व्यक्ती कोरोनाच्या संसर्गातून मुक्त झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या आता १७ वर आली आहे. दरम्यान, १७ एप्रिल रोजी १९ व्यक्तींचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यास एकाच दिवशी दोन दिलासे मिळाले. अद्याप २१ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरा. जी. पुरी यांनी दिली.
कोरोना आजारातून बरे झालेल्या तीनही रुग्णांना स्थानिक स्त्री रुग्णालयामध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देत असल्याचे पत्र देण्यात आले आहे.
दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील दहा क्लस्टर कंटेन्मेंट झोनमध्ये ३२६ पथकांद्वारे ८५ हजार ५६९ नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. १७ एप्रिल रोजी एकूण ७९ हजार ६९६ नागरिकांची तपासणी व सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करणाऱ्यांच्या मदतीसाठी ६४ डॉक्टरांचा समावेश असून पर्यवेक्षकांची संख्या ८२ आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान पथकांना एकूण ३२ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली. सुदैवाने यापैकी कोणालाही श्वास घेण्यास त्रास होत नसल्याचेही जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान ८५ हजार नागरिकांमध्ये काही दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींचेही सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
१६ हजार घरांना भेटी
आरोग्य पथकांनी १६ हजार १२६ घरांना १७ एप्रिल रोजी भेटी देऊन तेथील नागरिकांची वैद्यकीय दृष्ट्या माहिती संकलीत केली आहे. यामध्ये मलकापूरमधील९१५ बुलडाण्यातील जुन्या गावातील १५२०, मिर्झानगर परिसरातील ३,२३४, चिखलीतील ९१७, देऊळगाव राजातील १०२३ घरांना भेटी देऊन सर्व्हेक्षण केले.
३२ जणांना ताप, खोकला
तपासणी करण्यात आलेल्या ७९ हजार नागरिकांमध्ये देऊळगाव राजात १२ आणि मलकापूरमधील १९ व्यक्तींमध्ये सदी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली आहे. चितोडा येथे एका व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून आली. त्यामुळे शुक्रवारी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातही बुलडाणा जिल्ह्यास एक प्रकारे दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे.