CoronaVirus in Khamgaon : चितोडा येथील २५ जण क्वारंटीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:31 AM2020-04-06T10:31:06+5:302020-04-06T10:31:31+5:30
तर कोरोना पॉझिटीव्ह असलेला रूग्ण खामगाव येथील रूग्णालयात क्वारंटीन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील चितोडा येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचे नातेवाईक आणि शेजाºयांना क्वारंटाईन करण्यात अखेर प्रशासनाला रात्री उशीरा यश आले. चितोडा येथील सुमारे २५ जणांना क्वारंटाईन करण्यासाठी बुलडाणा येथे नेण्यात आले. तर कोरोना पॉझिटीव्ह असलेला रूग्ण खामगाव येथील रूग्णालयात क्वारंटाईन आहे.
रविवारी सकाळी बुलडाणा येथून पाठविण्यात आलेल्या स्वाब नमुन्यांपैकी ३ नमुने पॉझिटीव्ह आले. यामध्ये खामगावातील चितोडा येथील एका २३ वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. सकाळी दहा वाजता अहवाल प्राप्त झाल्यानंतर रूग्णालय प्रशासनाने दुपारीच चितोडा हे गाव सिल केले. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तब्बल २५ पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करण्यासाठी तालुका आणि आरोग्य प्रशासनाला चांगलीच दमछाक करावी लागली.
अखेर रात्री उशीरा चितोडा येथील त्या पॉझिटीव्ह रूग्णाच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. रूग्णवाहिकांमधून त्यांना बुलडाणा येथे नेण्यात आले.
दिल्ली येथील एका धार्मिक स्थळावरून चितोडा येथील हा युवक नुकताच परतला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्याचा शोध घेऊन, क्वारंटाईन केले होते. दरम्यान, त्याचा स्वाब नमुना नागपूर येथे पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून त्याचे कुटुंबिय, नातेवाईक आणि संपर्कातील लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे.
गावातील नागरिकांची तपासणी!
चितोडा येथील एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर खामगाव येथील आरोग्य पथक चितोडा येथे धडकले आहे. या गावातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. रविवारी अनेकांची तपासणी केल्यानंतर सोमवारी पुन्हा आरोग्य पथकाकडून गावातील नागरिकांची तपासणी केली जात आहे.
गावातील नागरिक भयभित!
गावात कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यानंतर चितोडा येथील नागरिक चांगलेच भयभित झाले आहेत. गावात कुणीही बाहेर पडणार नाही, याची खबरदारी गावकरी स्वत:च घेत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात निर्जंतुकीरण द्रावणाची फवारणी करण्यात आली.